पुढारी ऑनलाईन डेस्क : तब्बल एक वर्षाच्या खंडानंतर चीनमध्ये कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिलिन प्रांतात आढळलेल्या या रुग्णावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. २०२०मध्ये चीनमधील वुहान शहरातच कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर चीनने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर निर्बंध लादले. येथील रुग्णसंख्येत घट झाली होती. मात्र मागील काही दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्येत वाढताना दिसत आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे चीनमधील काही शहरातील आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. याचा फटका चीनमधील भारतीय विद्यार्थांना बसत आहे. चीनमध्ये सुमारे २३ हजार भारतीय विद्यार्थी शिक्षणानिमित्त वास्तव्यास आहेत. नव्या नियमांमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
जगभरात मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही ठिकाणी कोरोनाचा व्हेरियंट ओमायक्रॉन संसर्गाचा वेग भयावह होता.अमेरिकेतही बीए २ या ओमायक्रॉनच्या व्हेरियंटच्या संसर्गात वाढ होत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे. अन्यथा अमेरिकेत पुन्हा लॉकडाउन लावण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. ॲथनी फैसी यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशीही चर्चा केली आहे.
मागील आठवडयात दक्षिण कोरियामध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. शनिवारी तब्बल ३ लाख ८१ हजार ४५४ नव्या
रुग्णांची नोंद झाली. देशात सध्या तब्बल ९ लाख ३८ हजार ९३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, असे देशातील योंहाप वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. मात्र एक दिलासादायक बाब म्हणजे, मागील आठवड्यापेक्षा आता रुग्णसंख्या कमी होताना दिसत असल्याचे देशातील आपत्ती निवारण विभागाच्या सूत्रांनी म्हटलं आहे.
जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना कोरोना प्रतिबंधक नियम पालन काटेकोरपणे करावे, अशी सूचना केली आहे.
हेही वाचलं का?