China nuclear arsenal SIPRI Report China nuclear warheads 2035
नवी दिल्ली : चीनची अण्वस्त्र क्षमता जगात सर्वाधिक वेगाने वाढते आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या नव्या अहवालानुसार, चीनने 2023 पासून दरवर्षी स्वतःच्या शस्त्रसाठ्यात सुमारे 100 नव्या अण्वस्त्रांचा समावेश केला आहे आणि 2025 च्या सुरुवातीपर्यंत त्यांच्याकडे सुमारे 600 अण्वस्त्र (nuclear warheads) आहेत. SIPRI ने सोमवारी जाहीर केलेल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे.
सद्यस्थितीत SIPRI ने असा अंदाज व्यक्त केला आहे की चीन देखील आता काही अण्वस्त्रे 'लाँच-रेडी' स्थितीत ठेवत आहे, जी पूर्वी केवळ अमेरिका आणि रशियाकडे असायची.
चीनने उत्तर भागातील वाळवंटी प्रदेशात आणि पूर्व भागातील डोंगराळ भागात एकूण 350 आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) सिलोस पूर्ण केले आहेत किंवा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. या सिलोसद्वारे चीनची ICBM क्षमता 2030 पर्यंत अमेरिका आणि रशियाच्या तुलनेत खूप जवळ पोहोचू शकते.
तरीही, SIPRI च्या अंदाजानुसार, 2035 पर्यंत चीनची अण्वस्त्रांची संख्या 1500 पर्यंत पोहोचली तरी ती अमेरिका आणि रशियाच्या सध्याच्या साठ्याच्या केवळ एक-तृतीयांश इतकीच असेल. सध्या अमेरिका आणि रशियाकडे प्रत्येकी अंदाजे 4000 ते 6000 अण्वस्त्रे आहेत.
SIPRI चे संचालक डॅन स्मिथ यांनी इशारा दिला आहे की, अण्वस्त्र नियंत्रणासाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय करारांची ताकद कमी होत चालली आहे आणि त्यामुळे नव्या अणुशस्त्र स्पर्धेचा धोका निर्माण झाला आहे.
“चीनची अण्वस्त्र शक्ती सातत्याने वाढते आहे आणि पुढील 7-8 वर्षांत ही संख्या 1000 वॉरहेड्सपर्यंत पोहोचू शकते,” असे स्मिथ यांनी म्हटले आहे.
इस्रायल
जरी इस्रायलने अधिकृतपणे आपले अण्वस्त्र धोरण ‘सामरिक अस्पष्टता’ (strategic ambiguity) म्हणून ठेवली असली, तरी 2024 मध्ये त्याने मिसाईल प्रोपल्शन सिस्टमची चाचणी घेतली. याचा संबंध 'जेरिको' या अण्वस्त्रक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र मालिकेशी असू शकतो. शिवाय, डिमोना येथील प्लुटोनियम रिऍक्टरचे अद्ययावतीकरण सुरू असल्याचे संकेत आहेत.
भारत
2024 मध्ये भारतानेही आपली अण्वस्त्र साठवणूक वाढवली असून, ‘कॅनिस्टराईज्ड’ मिसाईल्स विकसित करण्यावर भर दिला आहे. हे पूर्णत्वास गेल्यावर भारत क्षेपणास्त्रांमध्ये आधीपासून वॉरहेड लावून साठवू शकेल आणि एका क्षेपणास्त्रातून अनेक वॉरहेड्स सोडण्याची क्षमता मिळवू शकेल.
पाकिस्तान
पाकिस्ताननेही 2024 मध्ये अणुकार्यक्रम पुढे नेला असून नवीन डिलिव्हरी सिस्टिम्स विकसित केल्या आहेत व फिसाइल मटेरियलचा साठाही वाढवला आहे.
नुकतेच पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने राबवलेले ऑपरेशन सिंदूर यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी तणाव खूप वाढला होता.
दोन्ही देशांच्या निशाण्यावर एकमेकांची अण्वस्त्र-संबंधित लष्करी ठिकाणे होती. SIPRI च्या अहवालानुसार, या संघर्षात थर्ड पार्टीकडून चुकीची माहिती (disinformation) पसरवण्यात आली, ज्यामुळे पारंपरिक युद्ध अणुयुद्धात बदलण्याची शक्यता निर्माण झाली होती.
SIPRI मधील अण्वस्त्र विभागाचे संशोधक मॅट कोर्डा यांनी म्हटले, “ही घटना हे स्पष्ट दाखवते की अण्वस्त्रांवर अधिक अवलंबून राहणे किती धोकादायक ठरू शकते.”
एकूण अण्वस्त्रे (जानेवारी 2025 पर्यंत): 12241
लष्करी साठ्यातील वापरासाठी सज्ज : 9614
तैनात केलेली (मिसाईल्स किंवा विमानांवर): 3912
हाय ऑपरेशनल अलर्टवर (तात्काळ वापरासाठी): सुमारे 2100 (बहुतेक अमेरिका आणि रशियाची)