

Pizza orders Pentagon OSINT Pentagon Pizza Index Israel Iran conflict Military activity indicator Pre-war signals Global crisis indicator CIA
वॉशिंग्टन डी. सी. : इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इराणवर हवाई हल्ला करण्याची तयारी सुरू केली होती. याच वेळी, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनजवळील आर्लिंग्टन शहरातील पेंटॅगॉन परिसरात एक वेगळाच प्रकार घडत होता – पिझ्झा दुकानांमध्ये अचानक ग्राहकांची गर्दी आणि ऑर्डरमध्ये प्रचंड वाढ झाली.
हे सामान्यतः दिसणारे चित्र नव्हते. विशेषतः पेंटॅगॉन आणि अमेरिकेच्या संरक्षण विभागाजवळील डॉमिनोज, पिझ्झा हट आणि इतर फास्टफूड चेनमध्ये रात्री उशिरापर्यंत अफाट मागणी वाढलेली दिसून आली.
पेंटॅगॉन जे अमेरिकेचे सुरक्षा मुख्यालय आहे- तिथून जवळपास पिझ्झा आणि इतर फास्टफूडच्या विक्रीत वाढ हा युद्धाचा संकेत मानला जातो. हा एक विशिष्ट पॅटर्न ठरला आहे. मागील अनेक दशकांपासून हा पिझ्झा पॅटर्न आणि जागतिक संकट यात एक सहसंबंध दिसून आला आहे.
एका ‘X’ (पूर्वी ट्विटर) वरील खात्याच्या अहवालानुसार, जे Pentagon Pizza Index नावाने ओळखले जाते, 13 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास, पेंटॅगॉनपासून 8 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या डॉमिनोजमध्ये गुरुवारी अपेक्षित असलेल्या नेहमीच्या गर्दीपेक्षा अनेक पट अधिक गर्दी आढळून आली.
12 जून रोजी संध्याकाळी 6:59 वाजता त्या खात्याने एक पोस्ट केली होती – “पेंटॅगॉनजवळील जवळपास सर्व पिझ्झा दुकाने अतिप्रमाणात व्यस्त आहेत.”
या वाढलेल्या पिझ्झा ऑर्डर्स आणि जागतिक संघर्षामध्ये एक अदृश्य संबंध आहे, असं ओपन-सोर्स इंटेलिजन्स (OSINT) विश्लेषकांचं म्हणणं आहे. Pentagon Pizza Index हे खाते Google Maps, Uber Eats, DoorDash आणि इतर प्लॅटफॉर्मचा डेटा वापरून या घडामोडींचा मागोवा घेतं.
हा ट्रेंड केवळ सध्याचा नाही तर कोल्ड वॉर (दुसऱ्या महायुद्धाची अखेर ते सोव्हिएत रशियाचे पतन 1945-1990) काळातही सोव्हिएत युनियनचे गुप्तहेर अमेरिकेतील पिझ्झा दुकानांवरील हालचालींवर लक्ष ठेवत असत.
1 ऑगस्ट 1990 रोजी, वॉशिंग्टन डीसीमधील एका डॉमिनोज फ्रँचायझीकडून सीआयए मुख्यालयात अचानक वाढलेली पिझ्झा मागणी नोंदवली गेली होती. त्याच रात्री, इराकने कुवैतवर आक्रमण केलं.
1991 मध्ये ऑपरेशन डेजर्ट स्टॉर्मपूर्वीही असेच काही नोंद झाले होते.
12 जूनपासून इस्रायलने इराणच्या लष्करी आणि अणु केंद्रांवर हल्ला केला. यात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख हुसैन सलामी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी ठार झाले. त्यानंतर, इराणनेही प्रत्युत्तर देताना तेल अवीव आणि जेरुसलेमवर मिसाईल हल्ले केले. नागरिकांना बंकरमध्ये आसरा घ्यावा लागला.
पेंटॅगॉनजवळ अचानक वाढणाऱ्या पिझ्झा ऑर्डर्स केवळ अन्नाची मागणी नाही, तर त्या मागे चालणाऱ्या गुप्त हालचालींचा संकेत असतो. युद्धजन्य स्थिती निर्माण होण्यापूर्वी सुरक्षादलांमध्ये वाढलेली हालचाल आणि अधिकाऱ्यांची रात्रीपर्यंत कामाची आवश्यकता – याचा परिणाम अशा ऑर्डरमध्ये दिसतो.
जगभरात सुरू असलेल्या राजकीय तणावांचा किंवा संभाव्य युद्धाचा अंदाज आता केवळ राजकीय विश्लेषकांपुरता मर्यादित राहिलेला नाही – एका पिझ्झा दुकानाच्या ऑर्डर ट्रॅफिकवरूनही संकटाची चाहूल लागू शकते. तथापि, असा अंदाज घ्यायचा असेल, तर खालील घटक व विश्लेषण पद्धती उपयुक्त ठरतात.
सार्वजनिकपणे उपलब्ध असलेली माहिती वापरून विश्लेषण करणे. यात सॅटेलाइट इमेजेस, सैनिकी हालचाली, बॉर्डरवर तळांची वाढ, फ्लाइट ट्रॅकिंग, लष्करी विमानांचे ट्रॅकिंग, मरीन ट्रॅफिक, युद्धनौका किंवा सबमरीन यांच्या हालचाली, सोशल मीडिया पोस्ट यांचे विश्लेषण केले जाते.
लष्करी आणि राजकीय हालचाली: यात सरकारी इशारे आणि भाषणे, पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष किंवा परराष्ट्र मंत्रालयाची वक्तव्ये यांचा समावेश होता. त्यावरून अंदाज बांधता येतो.
सैन्य हलवणे: मोठ्या प्रमाणावर सैन्य हलवणे, सैनिकी सराव, विशेषतः बॉर्डरलगत अचानक वाढलेले सराव, हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करणे यातूनही अंदाज बांधता येतो.
चलन घसरण, स्टॉक मार्केट व्यवहारात संरक्षण कंपन्यांचे शेअर्स अचानक वाढणे, तेलाच्या किंमतीत चढउतार, विश्वासार्ह प्रसारमाध्यमांच्या बातम्या, विशिष्ट संकेत पेंटॅगॉन पिझ्झा इंडेक्स, विशिष्ट गुप्त ठिकाणांवर वाहनांची वाढलेली हालचाल, टेलिकॉम ब्लॅकआउट / इंटरनेट बंद पडणे यातूनही हे अंदाज बांधले जाऊ शकतात.