Xi Jinping India Visit Controversy: चीनचे राष्ट्रपती शी जिंगपिंग हे तब्बल ७ वर्षानंतर भारत भेटीवर येणार असल्याचे वृत्त आले होते. मात्र आता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. गुरूवारी बिजिंगमध्ये ज्यावेळी चीनच्या परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ते गुओ जियाकुन यांना राष्ट्रपती शी जिंगपिंग यांच्या भारत दौऱ्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी याबाबत त्यांना काही माहिती नाही असं म्हणत माहिती देणं टाळलं.
मात्र काही वेळातच परराष्ट्र मंत्रालयाने शी जिंगपिंग हे १८ व्या ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहणार असं जाहीर केलं. आधी माहिती देणं टाळणं अन् नंतर घोषणा करणं यामुळं माध्यमांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.
नवी दिल्लीत ११ ते १३ सप्टेंबर रोजी ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे. या परिषदेसाठी ब्रिक्स देशांचे राष्ट्रप्रमुख भारतात दाखल होत आहेत. मात्र ब्रिक्समध्ये रशियाचे राष्ट्रपती पुतीन आणि इराणचे राष्ट्रपती पेजेश्कियान सामील होणार की नाही याबाबत अजून दुजोरा मिळालेला नाही.
याचबरोबर चीनचे राष्ट्रपती शी जिंगपिंग हे देखील भारत भेटीवर येतील याबाबत खात्रीशील माहिती मिळालेली नाहीये. गुरूवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी प्रवक्ते जियाकुन यांना चीनचे प्रमुख नेते पुढच्या आठवड्यात भारतात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहणार आहे का? असा प्रश्न विचारला.
या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी, 'तुम्ही विचारल्या गेलेल्या प्रश्नावर माझ्याकडे देण्यासाठी कोणतीही माहिती नाहीये.'
यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरून शी जिंगपिंग हे भारतात होणाऱ्या १८ व्या ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहतील. ते १२ आणि १३ सप्टेंबरला दिल्लीत असतील अशी घोषणा केली.
यापूर्वी गुरूवारी बातमी आली होती की चीनचे राष्ट्रपती ब्रिक्स सम्मेलनमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांसोबत द्विपक्षीय बैठक देखील करू शकतात. २०२० मध्ये भारत आणि चीन लष्कराची गलवान खोऱ्यातील हिंसक झडप झाली होती. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि शी जिंगपिंग हे द्विपक्षीय चर्चेसाठी पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.
जर शी जिंगपिंग भारतात येतात तर ती त्यांची ७ वर्षानंतरची पहिली भारत भेट असणार आहे. असं असलं तरी भारत आणि चीन यांच्याकडून अजून प्रस्तावित द्विपक्षीय बैठकीला दुजोरा देण्यात आलेला नाही. याबाबत कोणतेही औपचारिक विधान करण्यात आलेलं नाही. भारत आणि चीनच्या सर्वोच्च नेत्यांनी नुकतेच किर्गिस्तानच्या बिश्केशमध्ये शांघाय सहयोग संघटन (SCO) समिट मध्ये एकाच मंचावर होते.
त्यावेळी दोघांनी हस्तांदोलन केलं मात्र औपचारिक द्विपक्षीय बैठक झाली नाही. शी जिंगपिंग यांच्या भारत भेटीपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दोन्ही देशांमध्ये राजनैतिक चर्चा सुरू ठेवण्याच्या प्रयत्नाअंतर्गत एक दौरा करत उच्चस्तरीय चर्चेसाठी चीनचा दौरा केला होता. भारत आणि चीन यांच्यातील सीमा प्रश्नावर सल्लागार आणि समन्वय निर्माण व्हावा यासाठी एक कार्य प्रणाली तयार करण्यासाठी ही बैठक झाली होती. त्यानंतर सीमा प्रश्नावर दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींची चर्चा झाली होती.