Xi Jinping | प्रतिस्पर्धी नको, भागीदार बना! राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन

US China relations
Xi Jinping | प्रतिस्पर्धी नको, भागीदार बना! राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन
Published on
Updated on

बीजिंग; वृत्तसंस्था : संपूर्ण जगाचा डोळा आपल्या बैठकीकडे आहे. जागतिक स्थिरतेसाठी अमेरिका-चीन संबंध महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अमेरिकेने चीनचा भागीदार बनले पाहिजे, प्रतिस्पर्धी नव्हे. व्यापार युद्धात कोणीही जिंकत नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे, असे आवाहन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केले.

ट्रम्प यांनी गुरुवारी बीजिंगमध्ये जिनपिंग यांची भेट घेतली. जिनपिंग यांनी ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे ट्रम्प यांचे स्वागत केले. ट्रम्प यांना मानवंदना देण्यात आली. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी हातात अमेरिका आणि चीनचे ध्वज घेऊन शेकडो शाळकरी मुलेही आली होती. उभय नेत्यांची भेट दोन तास चालली.

जिनपिंग म्हणाले, चांगले भविष्य घडवण्यासाठी अमेरिका आणि चीनने एकत्र काम केले पाहिजे. संपूर्ण जग या बैठकीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. जागतिक परिस्थिती अस्थिर आहे. आता प्रश्न हा आहे की अमेरिका आणि चीन संघर्ष टाळून संबंधांचे एक नवीन प्रारूप तयार करू शकतात का? जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि जगाला अधिक स्थिरता प्रदान करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र काम केले पाहिजे. आपण जगासाठी, आपल्या लोकांसाठी आणि मानवतेच्या भविष्यासाठी आपल्या द्विपक्षीय संबंधांचे एक चांगले भविष्य घडवू शकतो का? हे प्रश्न इतिहास, जग आणि लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन त्यांची उत्तरे दिली पाहिजेत. अमेरिका आणि चीन हे प्रतिस्पर्धी नव्हे, तर भागीदार असले पाहिजेत. जगातील दोन सर्वात मोठ्या शक्तींनी संघर्षाऐवजी सहकार्याचा मार्ग अवलंबला पाहिजे. अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे आहेत. व्यापार युद्धात कोणीही विजयी होत नाही. चीन-अमेरिका आर्थिक आणि व्यापारी संबंधांचा पाया परस्पर लाभ आणि उभयपक्षी सहकार्य हाच आहे. अमेरिकन कंपन्यांसाठी चीनचे दरवाजे आणखी खुले केले जातील. दोन्ही देशांनी सध्याचे सकारात्मक वातावरण टिकवून ठेवण्यासाठी एकत्र काम करावे.

तैवान मुद्दा चर्चेत

शी जिनपिंग म्हणाले की, तैवानचा मुद्दा अमेरिका-चीन संबंधांमधील सर्वात महत्त्वाचा आहे आणि जर तो योग्यरीत्या हाताळला नाही, तर दोन्ही देशांमधील संबंध अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचू शकतात. दरम्यान, त्यावर तैवानच्या मंत्रिमंडळ प्रवक्त्या मिशेल ली म्हणाल्या की, चीनच्या लष्करी हालचाली हे तैवान सामुद्रधुनी आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील अस्थिरतेचे मुख्य कारण आहे. चीनची लष्करी धमकी हेच प्रादेशिक तणावाचे एकमेव कारण आहे आणि सुरक्षा टिकवण्यासाठी संरक्षण क्षमता वाढवणे अत्यावश्यक आहे.

संबंध आणखी चांगले होणार : ट्रम्प

ट्रम्प म्हणाले, अमेरिकेत प्रत्येकजण या शिखर परिषदेबद्दल बोलत आहे. तुमच्यासोबत असणे हा सन्मान आहे. तुमचा मित्र असणे हा सन्मान आहे आणि अमेरिका व चीन यांच्यातील संबंध पूर्वीपेक्षाही अधिक चांगले होणार आहेत. जिनपिंग यांच्यासोबतचे आपले संबंध उत्कृष्ट आहेत. दोन्ही देशांचे भविष्य उज्ज्वल आहे.

17 उद्योगपती ट्रम्पसोबत दौर्‍यात सहभागी

एनव्हिडियाचे सीईओ, टेस्लाचे इलॉन मस्क, अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक, बोईंगचे सीईओ यांच्यासह 17 प्रमुख अमेरिकन उद्योगपती या दौर्‍यात ट्रम्प यांच्यासोबत आहेत.

9 लाख कोटींचा करार शक्य

या दौर्‍यातील सर्वात मोठी चर्चा बोईंग विमान कराराबाबत आहे. अहवालानुसार, चीन अमेरिकन कंपनी बोईंगकडून सुमारे 9 लाख कोटी रुपयांच्या विमानांची खरेदी करण्याचा मोठा करार करू शकतो.

गोमांस आयातीस पुन्हा मंजुरी

बीजिंगने 15 महिन्यांच्या खंडानंतर अमेरिकेच्या गोमांस आयातीला पुन्हा परवानगी दिली. चीनने शेकडो अमेरिकन मांस प्रक्रिया कंपन्यांना निर्यात परवाने पुन्हा जारी केले आहेत. हा निर्णय या भेटीच्या अगदी आधी घेण्यात आला.

ट्रम्प यांची टेम्पल ऑफ हेवनला भेट

बीजिंगच्या ऐतिहासिक टेम्पल ऑफ हेवनला ट्रम्प यांनी भेट दिली. ट्रम्प आणि जिनपिंग यांनी मंदिराच्या मुख्य इमारतीसमोर छायाचित्रांसाठी पोझ दिली. दोन दिवसांपासून हे मंदिर जनतेसाठी बंद केले होते.

54 वर्षांनंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्री चीनमध्ये

अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ हे या दौर्‍यात आहेत. 1972 मध्ये रिचर्ड निक्सन यांच्या ऐतिहासिक चीन दौर्‍यानंतर, अमेरिकेचे संरक्षणमंत्री राष्ट्राध्यक्षांसोबत बीजिंगला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news