आंतरराष्ट्रीय

Epstein files controversy | "रशियन महिलेशी संबंध होते" : 'एपस्टीन फाइल्स'वर बिल गेट्स यांचा 'कबुलीनामा'

'बिल गेट्स फाउंडेशन'च्या कर्मचाऱ्यांची मागितली जाहीर माफी

पुढारी वृत्तसेवा

Bill Gates apology on Epstein files controversy

न्‍यूयॉर्क : जगातील प्रख्‍यात उद्योगपती आणि समाजसेवक बिल गेट्स पुन्हा एकदा जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित वादामुळे चर्चेत आले आहेत. या प्रकरणात अडकलेले बिल गेट्स आता माफी मागत आहेत. त्यांनी कबूल केले आहे की, त्यांचे दोन रशियन महिलांशी संबंध होते.

"माझ्याकडून मोठी चूक झाली आहे"

नुकत्याच समोर आलेल्या एपस्टीन प्रकरणातील नवीन कागदपत्रांमुळे वाद वाढल्यानंतर, गेट्स यांनी त्यांच्या 'बिल गेट्स फाउंडेशन'च्या कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "माझ्याकडून मोठी चूक झाली आहे." सूत्रांच्या माहितीनुसार, एका अंतर्गत बैठकीत (टाउनहॉल मीटिंग) जुन्या संबंधांबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गेट्स यांनी मान्य केले की, एपस्टीनसोबत वेळ घालवणे आणि फाउंडेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्याच्याशी ओळख करून देणे ही एक 'मोठी चूक' होती.

त्‍या निर्णयामुळे संस्‍थेतील लोकांना अडचणीचा सामना करावा लागला

त्यांनी पुढे सांगितले की, या निर्णयामुळे संस्थेतील लोकांना अडचणीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. या संपूर्ण प्रकरणाची मी जबाबदारी घेत आहे. 'एपस्टीन फाइल्स'मध्ये उल्लेख असलेल्या रशियन महिलांशी त्यांचे दोन अफेअर होते. मात्र, त्यांनी हे स्पष्ट केले की त्या संबंधांचा एपस्टीनच्या पीडितांशी कोणताही संबंध नव्हता.

'मी काहीही बेकायदेशीर केले नाही' : बिल गेट्स

अमेरिकन न्याय विभागाशी संबंधित काही कागदपत्रे आणि फोटो सार्वजनिक झाले. यामध्ये गेट्स आणि एपस्टीन यांच्या अनेक भेटींचा उल्लेख आहे. काही फोटोंमध्ये गेट्स अशा महिलांसोबत दिसत आहेत ज्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.'इंडिया टुडे'च्या रिपोर्टनुसार, बैठकी दरम्यान गेट्स यांनी रशियन महिलांसोबतच्या दोन वैयक्तिक संबंधांची कबुली दिली. तरीही त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, "मी काहीही बेकायदेशीर केलेले नाही आणि तसे काही घडताना पाहिले देखील नाही."

बिल गेट्स यांनी फिरवली होती 'AI इम्पॅक्ट समिट 2026' कडे पाठ

'एपस्टीन फाइल्स' वादामुळे बिल गेट्स यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांवरही परिणाम झाला आहे. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भरकटू नये म्हणून गेट्स यांनी नुकताच भारतात होणाऱ्या 'AI इम्पॅक्ट समिट 2026' मधील आपला सहभाग रद्द केला होता.गेट्स फाउंडेशनने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, त्यांचा एपस्टीनशी कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT