

नवी दिल्ली : ‘मी जेफ्री एपस्टीनला तीन ते चार वेळा भेटलो, मात्र त्या भेटींचा विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांशी कोणताही संबंध नाही,’ असे स्पष्टीकरण हरदीपसिंह पुरी यांनी दिले आणि एपस्टीन फाईल्स संदर्भातील आरोप फेटाळले. लोकसभेत ‘एपस्टीन फाइल्स’चा उल्लेख करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते हरदीपसिंह पुरी यांनी उत्तर दिले.
मंत्री पुरी म्हणाले की, २००९ आणि २०१७ दरम्यान न्यूयॉर्कमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता संस्थेच्या प्रतिनिधी मंडळाचा सदस्य म्हणून मी एपस्टीनला भेटले होतो. ९ वर्षांत ४ वेळा माझी भेट झाली. मात्र ती स्वतंत्र बैठक नव्हती. संयुक्त राष्ट्रांच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थात्मक चर्चेच्या अनुषंगाने या भेटी झाल्या. मात्र एपस्टीनवरील लैंगिक शोषणासारख्या गंभीर आरोपांशी माझा काहीही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेत राहुल गांधी यांनी उद्योगपती अनिल अंबानी आणि हरदीप पुरी यांचा ‘एपस्टीन फाइल्स’मध्ये उल्लेख असल्याचा दावा केला होता. तसेच पुरींना एपस्टीनशी कोणी ओळख करून दिली? असा प्रश्न विचारत माझ्याकडे असलेली माहिती मी अधिकृतपणे सिद्ध करीन,” असेही राहुल गांधी म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर पुरी यांनी राहुल गांधींवर टीका करत प्रत्युत्तर दिले. ‘बिनबुडाचे आरोप करणे ही त्यांची सवय झाली आहे. जबाबदारी स्वीकारून काम करणारे नेते आणि अधूनमधून देशात येऊन आरोप करणारे नेते यांत फरक असतो,’ असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, ‘एपस्टीन फाइल्स’च्या संदर्भात संसदेत झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.