Bangladesh Pakistan relations
ढाका/इस्लामाबाद: शेख हसीना यांना आंदोलनांनंतर सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. तेव्हापासून बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील जवळीक वाढल्याचे चित्र आहे. निवडणुकीनंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने घेतलेला निर्णय बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) चे सर्वेसर्वा व पंतप्रधान तारिक रहमान यांनी कायम ठेवला आहे. आता बांगलादेशने आपल्या १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाकिस्तानात 'मिड-करियर ट्रेनिंग'साठी पाठवले आहे. विशेष म्हणजे, १९७० च्या दशकाच्या सुरुवातीनंतर अशा प्रकारे वरिष्ठ नोकरशहांचा ताफा पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. बांगलादेशच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाकिस्तानात प्रशिक्षण; शेख हसीनांच्या सत्तांतरानंतर दोन्ही देशांतील जवळीक वाढल्याचे चित्र आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेले अधिकारी हे अतिरिक्त सचिव आणि संयुक्त सचिव दर्जाचे आहेत. यामध्ये वाणिज्य, लोक प्रशासन, गृह मंत्रालयासह कॅबिनेट विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांच्या पाकिस्तान भेटीमुळे इस्लामाबादला ढाकातील प्रशासकीय रचनेची अधिक जवळून माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लाहोर येथील 'सिव्हिल सर्व्हिसेस अकॅडमी' मध्ये बांगलादेशच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचा आर्थिक खर्च पाकिस्तान सरकार करणार आहे. बांगलादेशवर याचा कोणताही आर्थिक परिणाम होणार नाही. मात्र पाकिस्तानमधील प्रशासकीय रचनेची बांगलादेश अंमलबजावणी करणार हे स्पष्ट होऊ लागले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संबंध ताणलेले होते. मात्र, शेख हसीना यांच्या सत्तापत्तनानंतर बांगलादेशच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल होताना दिसत आहेत. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सत्तेत आले. या सरकारचे सर्व धोरण पाकिस्तानधार्जिणेच राहिले होते. बांगलादेशात १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. अपेक्षेप्रमाणे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा विजय झाला. पंतप्रधानपदाची धुरा तारिक रहमान यांच्याकडे आली. यानंतर या सरकारने मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचे परराष्ट्र धोरण कायम ठेवत पाकिस्तानशी जवळीक वाढवली आहे.
बांगलादेश आणि पाकिस्तानमधील व्यापार आणि कनेक्टिव्हिटीमध्येही वाढ झाली आहे. एकेकाळी टोकाचे मतभेद असणाऱ्या या दोन देशांमधील ही नवी मैत्री दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारी ठरू शकते, असे मानले जात आहे. आता बांगलादेशचे १२ वरिष्ठ शासकीय अधिकारी सध्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात गेले असून, १९७० च्या दशकाच्या सुरुवातीनंतर, म्हणजेच बांगलादेशच्या निर्मितीनंतर, बांगलादेशी सनदी अधिकाऱ्यांसाठी पाकिस्तानात आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच प्रशिक्षण कार्यक्रम आहे.
प्रशासकीय स्तरावर सुरू झालेला बांगलादेश-पाकिस्तान नवीन संवाद दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या घडामोडीकडे दक्षिण आशियातील बदलत्या प्रादेशिक समीकरणांच्या दृष्टीने पाहिले जात असून, भारतासह शेजारील देशांचे याकडे लक्ष लागून आहे.