Bangladesh False Claims On Hadi Killer: बांगलादेशी कट्टर इस्लामवादी विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादीची काही दिवसांपूर्वी ढाका इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बांगलादेशात हिंसक आंदोलने झाली. काही हिंदूंना देखील टार्गेट करण्यात आलं. दरम्यान बांगलादेश सरकारनं हादीचा मारेकरी हा भारतात पळून गेल्याचा आरोप केला होता.
मात्र आता हादीचा कथित मारेकरी ३७ वर्षाचा फैसल करीम मसूद उर्फ दाऊद याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याने बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारनं त्याच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने आपण भारतात पळून गेल्याच्या आरोपाते देखील खंडन केले आहे.
मसूद हा शरीफ उस्मान हादीच्या हत्येतील प्रमुख आरोपी आहे. त्याने व्हिडिओ शेअर करत तो दुबईत असल्याचा दावा केला होता. त्याचबरोबर त्यानं हादीच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचे आरोप देखील फेटाळले आहेत. हादीची १८ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली आहे.
हादीच्या हत्येनंतर सहा दिवसांनी २८ डिसेंबर रोजी ढाका सरकारनं दोन मुख्य संशयितांची नावे जाहीर केली होती. त्यात मसूद आणि आलमगीर शेख यांची नावे होती. बांगलादेशने हे दोन आरोपी भारतीय सीमा पार करून मेघालय राज्यात गेल्याचा आरोप केला होता. त्यांना बॉर्डर क्रॉस करण्यासाठी स्थानिकांनी मदत केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. हा दावा भारतानं फेटाळून लावला होता. भारतीय यंत्रणांनी हे वक्तव्य खोटं अन् चुकीचं असल्याचं सांगितलं.
दरम्यान, मसूद उर्फ दाऊद व्हिडिओत म्हणतो, 'मी फैसल करीम मसूद स्पष्टपणे सांगू इच्छितो की मी हादीच्या हत्येत कोणत्याही प्रकारे सहभागी नाही. ही केस पूर्णपणे खोटी आणि तथ्यहीन एका षडयंत्राचा भाग आहे. या चुकीच्या अन् खोट्या आरोपांमुळे मला नाईलाजानं माझा देश बांगलादेश सोडावा लागला अन् दुबईत यावं लागलं. माझ्याकडे जरी पाच वर्षाचा वैध मल्टीपल एन्ट्री व्हिसा असून देखील मी इथं खूप अडचणींचा सामना करत पोहचलो आहे.'
मसूदने तो हादीची हत्या होण्यापूर्वी हादीच्या ऑफिसमध्ये गेल्याचे मान्य करतो. मात्र त्याचे इन्कलाब मंचाच्या प्रवक्त्यांशी संबंध असल्याने तो तिथे गेल्याचं देखील सांगतो. तो फक्त व्यावसायिक कारणांमुळे गेल्याचा देखील दावा करतो.
मसूद म्हणाला की, 'मी हादीच्या ऑफिसमध्ये गेले होतो. मी उद्योगपती आहे. मी एका आयटी फर्मचा मालक आहे. मी यापूर्वी मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये कामाला होतो. मी नोकरीची संधी मिळावी यासाठी हादीला भेटण्यासाठी गेलो होते. त्याने मला नोकरी देण्याचे आश्वासन दिलं होतं आणि अॅडव्हान्स पेमेंट करण्यास देखील सांगितलं होतं.'
मसूद पुढे म्हणाला, ' मी त्याला ३ लाख टाका दिले होते. त्याने मला त्याच्या विविध प्रोग्रामसाठी देणगी देण्यास सांगितलं होतं. त्याने ज्यावेळी विनंती केली त्यावेळी मी त्याला निधी उपलब्ध करून दिला आहे.'