

Hadi murder case
ढाका : बांगलादेशमधील विद्यार्थी नेता शरीफ उस्मान बिल हादी हत्येतील दोन मुख्य संशयित आरोपी मेघालय सीमेवरून भारतात पसार झाले आहेत, अशी माहिती ढाका पोलिसांनी दिल्याचे वृत्त बांगलादेशमधील 'द डेली स्टार'ने दिले आहे. दरम्यान, पसार झालेल्या आरोपींना अटक करून त्यांचे बांगलादेशात प्रत्यार्पण करण्यासाठी बांगलादेश सरकार भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.
ढाका पोलीस मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त एस. एन. नझरुल इस्लाम यांनी सांगितले की, फैसल करीम मसूद आणि आलमगीर शेख या दोन संशयितांनी स्थानिक साथीदारांच्या मदतीने मयमनसिंग येथील हलुआघाट सीमेवरून भारतात प्रवेश केला आहे. त्यानंतर 'सामी' नावाच्या टॅक्सी चालकाने त्यांना मेघालयातील तुरा शहरात नेले." या दोघांनाही (पूर्ती आणि सामी) भारतीय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची अनौपचारिक माहिती मिळाली असून अधिकृत पुष्टी मिळणे अद्याप बाकी आहे.
आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू पसार झालेल्या आरोपींना अटक करून त्यांचे बांगलादेशात प्रत्यार्पण करण्यासाठी बांगलादेश सरकार भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही माध्यमांतून यासाठी संवाद सुरू असल्याचे नझरुल इस्लाम यांनी स्पष्ट केले.
ओस्मान हादी हा बांगलादेशमधील विद्यार्थी नेता होता. तो भारत आणि शीख हसीना यांच्या अवामी लीगचे कट्टर टीकाकार म्हणून ओळखले जात होता. 'जुलै उठावा'चे (विद्यार्थी आंदोलन) नेतृत्व त्याने केले होते. शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर त्याने 'इन्किलाब मंच' संघटना स्थापना केली होती. तो आगामी निवडणूक लढवण्याच्या तयारीत होता. १२ डिसेंबर रोजी ढाका येथे बुरखाधारी बंदूकधाऱ्यांनी हादी यांच्या डोक्यात गोळी झाडली होती. उपचारासाठी त्याला सिंगापूरला नेण्यात आले, मात्र सहा दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर बांगलादेशात मोठा हिंसाचार उसळला. संतप्त जमावाने 'प्रथम आलो' आणि 'द डेली स्टार' या वृत्तपत्रांच्या कार्यालयांसह 'छायानत' आणि 'उदिची शिल्पी गोष्ठी' या सांस्कृतिक संस्थांच्या कार्यालयांना आग लावली होती. हादीच्या निधनानंतर बांगलादेशचे काळजीवाहू पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी ही देशाची न भरून येणारी हानी झाल्याचं म्हटलं होतं.