बांगलादेश नॅशनल पार्टी ही पाकिस्तानच्या 'आयएसआय'चा हस्तक मानली जाणारी 'जमात-ए-इस्लामी'च्या तुलनेत अधिक उदारमतवादी आणि लोकशाहीवादी पर्याय म्हणून भारतासमोर असल्याचे मानले जात आहे. रेहमान यांचे पुनरागमन भारताच्या प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
India Bangladesh relations
ढाका : बांगलादेशमध्ये सत्तांतर होवून आता सव्वा वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. तरीही येथील हिंसाचाराचे सत्र कायम आहे. देशातील अल्पसंख्यांक हिंदू समुदायावरील हल्ले हा भारतासमोरील गंभीर प्रश्नांपैकी एक बनला आहे. अशातच आता बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांचे पुत्र आणि एकेकाळी बांगलादेशच्या राजकारणातील 'डार्क प्रिन्स' म्हणून ओळखले जाणारे तारिक रेहमान तब्बल 17 वर्षानंतर मायदेशात परतले आहेत. देशातील अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीचव्या काळात 'बांगलादेश नॅशनल पार्टी'(बीएनपी)साठी पक्षाचे प्रभारी अध्यक्ष परतणे हा एक अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हमान यांचे पुनरागमन भारताच्या प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
बांगलादेशमध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये सत्तांतर घडलं. सलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी देश सोडून भारतात आश्रय घेतला. आता यांचा 'बांगलादेश अवामी लीग' पक्षाला निवडणूक लढवण्यास बंदी आहे. तर बांगलादेश नॅशनल पार्टी या विरोधी पक्षाच्या सर्वेसर्वा खलिदा झिया रुग्णालयात उपचार घेत आहेत. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारखाली कट्टरपंथी इस्लामिक शक्ती आणि भारतविरोधी गट सक्रिय झाले आहेत. विशेषतः पाकिस्तानच्या 'आयएसआय'चा हस्तक मानली जाणारी 'जमात-ए-इस्लामी' पुन्हा राजकारणात घुसखोरी करत आहे. नुकत्याच झालेल्या जनमत चाचणीनुसार, आगामी निवडणुकीत बीएनपीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता असली, तरी जमात-ए-इस्लामी त्यांच्या पाठोपाठ आहे. ढाका विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये जमातच्या विद्यार्थी संघटनेने मिळवलेला विजय भारतासाठी चिंतेचा विषय ठरला होता. अशा तणावपूर्ण परिस्थितीत रेहमान यांच्या बीएनपी हा जमातच्या तुलनेत अधिक उदारमतवादी आणि लोकशाहीवादी पर्याय म्हणून भारतासमोर आहे. बीएनपी आणि भारताचे संबंध ताणलेले असले, तरी रहमान यांच्या पुनरागमनामुळे बीएनपी सत्तेत येईल आणि देशात स्थिरता निर्माण होईल, अशी आशा केंद्र सरकारला आहे.
शेख हसीना यांच्या काळात बांगलादेशने भारताशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासले होते, मात्र मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळात बांगलादेशचा कल पाकिस्तानकडे अधिक झुकल्याचे दिसत आहे. तारिक रहमान यांनी मात्र युनूस सरकारच्या परराष्ट्र धोरणांवर आणि जमात-ए-इस्लामीवर टीका केली आहे. त्यांनी 'बांगलादेश फर्स्ट' (आधी बांगलादेश) हे धोरण मांडताना स्पष्ट केले की, अन्य कोणत्याही देशापेक्षा आमच्यासाठी बांगलादेश सर्वोपरी आहे." १ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खलिदा झिया यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत मदतीचा हात पुढे केला होता. याला रेहमान यांच्या पक्षाने सकारात्मक प्रतिसाद दिला. भविष्यात रेहमान हे सत्तेत आल्यास बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध सकारात्मक होतील, असे मानले जात आहे.
रहमान यांचे ढाक्यात स्वागत करण्यासाठी विमानतळ ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत काढण्यात आलेल्या रोड शोमध्ये सुमारे ५० लाख कार्यकर्ते सहभागी झाले होते. १० विशेष गाड्यांमधून ३ लाखांहून अधिक समर्थक राजधानीत दाखल झाले होते. रहमान हे 'बोग्रा-६' मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र, या भव्य शक्तिप्रदर्शनामुळे कट्टरपंथी गट अस्वस्थ असून निवडणुकीपूर्वी बीएनपी आणि जमात यांच्यात संघर्षाची चिन्हे असल्याचा अंदाज देशातील राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
बांगलादेशचे माजी अध्यक्ष झियाउर रहमान यांचे पुत्र असलेले तारिक २००८ पासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. शेख हसीना यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. २००४ च्या प्रसिद्ध ग्रेनेड हल्ला प्रकरणात त्यांना शिक्षाही सुनावण्यात आली होती. २००१-२००६ या त्यांच्या सत्तेच्या काळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे प्रसारमाध्यमांनी त्यांना 'डार्क प्रिन्स' हे नाव दिले होते. तथापि, गेल्या वर्षभरात बांगलादेशच्या न्यायालयांनी त्यांची सर्व प्रमुख गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. आता आंदोलने आणि हिंसेने ग्रासलेल्या बांगलादेशात तरुण पिढीला आकर्षित करणे आणि पक्षाला एकसंध ठेवणे, हे रहमान यांच्यासमोरील मोठे आव्हान असेल. दक्षिण आशियातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भारत या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.