पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेश साेडण्यास २० मिनिटे उशीर झाला असता तर माझी आणि माझ्या बहिणीची हत्या झाली असती, असा मोठा दावा बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी केला आहे. बांगलादेश अवामी लीग पक्षाच्या फेसबुक पेजवर एक ऑडिओ भाषण त्यांनी पोस्ट केले आहे.
५ ऑगस्ट रोजी शेख हसीना बांगलादेशमधून पलायन करुन भारतात आश्रयाला आल्या. तेव्हापासून त्यांचे वास्तव्य भारतात आहे. बांगलादेशने त्यांच्या प्रत्यर्पणाची मागणी केली आहे. मात्र भारताने ती धुडकावून लावली आहे. आता बांगलादेशमधील निदर्शने आणि भारतात येण्यापर्यंतचा प्रवास शेख हसीना यांनी बांगलादेश अवामी लीग पक्षाच्या फेसबुक पेजवर एक ऑडिओ भाषणाच्या माध्यमातून सांगितला आहे.
ऑडिओ भाषणात शेख हसीना यांनी म्हटलं आहे की, ५ ऑगस्ट २०२४ रोजी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील ढाका हिंसक निदर्शने सुरु होती. ढाका सोडून पळून जाण्यापूर्वी काही क्षण आधी मला आणि माझ्या बहिणीची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र देवाच्या कृपेनेच हत्येच्या प्रयत्नातून आपण बचावलो. मी आणि माझी बहीण शेख रेहाना वाचण्यात यशस्वी झालो. बांगलादेश सोडण्यास २०-२५ मिनिटे उशिरा पोहोचलो असतो तर आपली हत्या झाली असती.
अलिकडेच भारत सरकारने शेख हसीना यांच्या व्हिसाची मुदत वाढवली आहे. बांगलादेशातून पळून गेल्यानंतर शेख हसीना भारतातील हिंडन एअरबेसवर पोहोचल्या. येथून त्यांना दिल्लीतील एका सुरक्षित घरात हलविण्यात आले होते. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी २३ डिसेंबर रोजी भारत सरकारला शेख हसीनाच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. युनूस यांनी शेख हसीनाच्या प्रत्यार्पणाची वारंवार मागणी केली आहे. शेख हसीना यांच्यावर बांगलादेशात अनेक गुन्हेगारी खटले दाखल आहेत आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातही त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. शेख हसीना २००९ पासून बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. सर्वात जास्त काळ पंतप्रधानपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.