Ayub Khan & Asim Munir Pudhari
आंतरराष्ट्रीय

Ayub Khan to Asim Munir | पाकिस्तानचे पहिले फील्ड मार्शल बनले हुकुमशहा; आता दुसरे फील्ड मार्शल मुनीर पाकसाठी किती धोकादायक ठरणार?

Ayub Khan to Asim Munir : लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पाकिस्तान सरकारने फील्ड मार्शलपदी बढती दिली आहे.

Akshay Nirmale

Asim Munir becomes Pakistan's 2nd field marshal first one became a dictator

नवी दिल्ली: पाकिस्तान सरकारने 20 मे रोजी विद्यमान लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती दिली. ते पाकिस्तानचे दुसरे फील्ड मार्शल ठरले. हे पद पाकिस्तानातील सर्वोच्च लष्करी पद आहे.

ही बढती पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जण ठार झाले आणि त्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभुमीवर दिली गेलेली आहे.

दरम्यान, मुनीर यांच्या या पदोन्नतीने पाकिस्तानच्या इतिहासातील पहिल्या फिल्ड मार्शलच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पुढे जाऊन पाकिस्तानचे हे पहिले फिल्ड मार्शल पाकिस्तानचे हुकुमशहा बनले होते. मुहंमद अयूब खान असे त्यांचे नाव.

आयुब खान यांनी सैन्याच्या बंडखोरीनंतर स्वतःच स्वतःला फिल्ड मार्शल ही पदवी बहाल केली होती. आता मात्र मुनीर यांची बढती सरकारच्या मान्यतेने झाली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

7 ऑक्टोबर 1958 रोजी पाकिस्तानमध्ये मोठी राजकीय अस्थिरता निर्माम झाली होती. वारंवार सरकार बदल, भ्रष्टाचार आणि जनतेचा वाढता रोष यामुळे नागरी संस्थांचे अस्तित्व धोक्यात आले होते.

त्यावेळी राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांनी लष्करी कायदा लागू केला आणि लष्करप्रमुख अयूब खान यांना चीफ मार्शल लॉ अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून नेमले. मात्र केवळ 20 दिवसांनंतर आयूब खान यांनी इस्कंदर मिर्झांविरुद्ध बंड केले.

27 ऑक्टोबर 1958 रोजी संध्याकाळी, राष्ट्रपती मिर्झा आणि आयूब खान एकत्र चहा पिताना कॅमेऱ्यासमोर दिसले होते.

पाकमध्ये प्रथमच लष्करप्रमुखाकडे सत्तेचे हस्तांतरण

पण त्याच रात्री साडेबारा वाजता, तीन उच्चपदस्थ जनरल राष्ट्रपती भवनात अचानक पोहोचले. त्यांनी मिर्झा यांना सांगितले की ते आयूब खान यांच्या आदेशावर काम करत आहेत. राजीनामा द्या अन्यथा बळजबरीने हटविले जाईल, असा स्पष्ट संदेश त्यांना दिला गेला.

कोणताही दुसरा पर्याय नसल्याने मिर्झा यांनी दबावाखाली राजीनामा दिला आणि आयूब खान पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती झाले. हे लष्कराने पाकिस्तानातील सत्तेचे केलेले पहिले हस्तांतरण होते.

राजीनाम्यानंतर मिर्झा यांना क्वेट्टामध्ये पाठवण्यात आले आणि नंतर लंडनमध्ये निर्वासित जीवनात ठेवण्यात आले, जिथे 1969 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

संसद, राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांवर मर्यादा

एक वर्षानंतर 1959 मध्ये आयूब खान यांनी स्वतःला फील्ड मार्शल पद बहाल केले. हे पद सामान्यतः मोठ्या युद्धांतील विजय किंवा प्रदीर्घ सैन्य सेवेनंतर दिले जाते.

मात्र पाकिस्तानच्या बाबतीत, हे पद स्वघोषित होते आणि आयूब खान यांनी निर्माण केलेल्या गुप्त राजकीय व्यवस्थेमुळे त्याला फारसा आक्षेपही घेण्यात आला नाही.

संसद, राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांवर मर्यादा घातल्या. अयूब खान यांचं प्रशासन तांत्रिकदृष्ट्या प्रभावी मानलं गेलं. इंफ्रास्ट्रक्चर, कृषी सुधारणा आणि औद्योगिक विकास यामध्ये त्यांनी बरीच कामगिरी केली.

भारतासोबत युद्धानंतर लोकप्रियता घटली...

पुढील 11 वर्षे आयूब खान यांनी पाकिस्तानचा राज्यकारभार पाहिला. त्यांनी आर्थिक सुधारणा, पायाभूत सुविधा प्रकल्प राबवले आणि शीत युद्ध काळात अमेरिका व चीनशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. त्यांच्या कारकिर्दीत भारतासोबत सिंधू जल करार झाला. त्यांच्याच काळात 1965 चे भारत-पाक युद्धही घडले. त्यानंतर मात्र त्यांची लोकप्रियता घटू लागली.

युद्धानंतर जनतेमध्ये आणि विशेषतः पूर्व पाकिस्तान (आजचा बांगलादेश) मध्ये असंतोष वाढू लागला. भ्रष्टाचार, महागाई, आणि राजकीय विरोध यामुळे आयूब खान यांच्याविरुद्ध आंदोलने उफाळली.

विद्यार्थ्यांचे आणि मजुरांचे मोर्चे दिवसेंदिवस तीव्र होत गेले. त्यानंतर खान यांनी 1969 मध्ये राजीनामा दिला आणि सत्ता जनरल याह्या खान यांच्याकडे सुपूर्त केली.

पाकिस्तानात हुकुमशाहीची बीजे पेरणारा सत्ताधीश

राजीनाम्यानंतर आयूब खान पूर्णपणे राजकारणातून निवृत्त झाले. ते इस्लामाबाद येथे निमशांत, पण राजकीयदृष्ट्या अलिप्त जीवन जगत होते. त्यांनी काही आठवणी लिहिल्या, पण त्या फारशा प्रसिद्ध झाल्या नाहीत. 19 एप्रिल 1974 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

आयूब खान यांना पाकिस्तानचा "पहिला लष्करी हुकूमशहा" मानले जाते. त्यांच्या काळात आर्थिक प्रगती झाली, पण लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्यांची गळचेपीही झाली.

त्यांनी घातलेली हुकूमशाही परंपरेची बीजे पुढे झुल्फिकार अली भुट्टो, झिया-उल-हक यांच्यासारख्या नेत्यांनी चालू ठेवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT