Pakistan could lose millions after closing airspace for India
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात राजनैतिक पावले उचलली. पाकिस्ताननेही विविध राजनैतिक मार्ग वापरण्यास सुरवात केली. त्याअंतर्गत भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने आपला आकाशमार्ग (Airspace) बंद करण्याचा निर्णय घेतला.
पण, या निर्णयामुळे भारतापेक्षा पाकिस्तानचेच अधिक नुकसान होत असून पाकिस्तानला कोट्यवधी रूपयांचा फटका यातून बसणार आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राला आर्थिक नुकसान व्हावे याकरिता भारतीय विमानांसाठी आपले आकाशमार्ग पाकिस्तानने बंद केले. यामुळे उत्तर भारतातून उड्डाण करणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय मार्गांवर अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
परंतु, पाकच्या या निर्णयामुळे भारताचे फारसे नुकसान न होता, पाकिस्ताननेच स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतल्यासारखे झाले आहे.
हा निर्णय भारताला त्रास देण्यासाठी घेतला गेला असला, तरी त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानला विमान वाहतुकीमधून मिळणाऱ्या महसूलात कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
आता भारतीय विमानसेवा पाकिस्तानच्या आकाशातून न जाता इतर मार्गांनी प्रवास करू लागल्या आहेत, त्यामुळे एअरस्पेसचा वापर करणाऱ्या विमानांकडून घेतले जाणारे 'ओव्हरफ्लाइट फी'चे उत्पन्न पाकिस्तान गमावणार आहे.
एका पाकिस्तानी युजरने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून त्यात एक भारतीय विमान पाकिस्तानला वळसा घालून जाताना दाखवले आहे. तिने कॅप्शनमध्ये "और लो पंगा" असे म्हटले आहे.
त्यावर प्रत्युत्तर देताना 'X' (पूर्वीचे ट्विटर) वरील युजर नरेंन मेननने म्हटले आहे की, "पाकिस्तानने जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या (आणि सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या) विमान वाहतूक बाजारातून ‘ओव्हरफ्लाइट फी’ गमावली. हे उत्पन्न दरवर्षी शेकडो मिलियन आहे. मानवी इतिहासात एवढी सामूहिक मूर्खता क्वचितच दिसेल.
भारतातून युरोप व उत्तर अमेरिकेकडे जाणाऱ्या मोठ्या संख्येतील उड्डाणांमुळे, भारतीय विमानांना रोखणे पाकिस्तानसाठी अत्यंत महागात पडू शकते. भारतातून पश्चिमेकडे जाणाऱ्या बहुतेक उड्डाणांचे संचालन एअर इंडिया व इंडिगोसारख्या भारतीय कंपन्यांकडूनच केले जाते. त्यामुळे पाकिस्तान त्याच्या ओव्हरफ्लाइट फी उत्पन्नाचा मुख्य भाग गमावणार आहे.
ही पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झालेली नाही. 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी त्यांची एअरस्पेस बंद केली होती. त्यावेळी पाकिस्तानला जवळपास 100 मिलियन डॉलर्सचे नुकसान झाले होते.
दररोज सुमारे 400 उड्डाणांवर परिणाम झाला होता. ज्यामुळे पाकिस्तानच्या सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी (CAA) व पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) ला मोठे नुकसान झाले होते.
एका माहितीनुसार पाकिस्तानच्या एअरस्पेसमधून जाणाऱ्या बोईंग 737 विमानाकडून सुमारे 580 डॉलर ओव्हरफ्लाईट फी आकारली जात होती.
मोठ्या विमानांसाठी हे शुल्क आणखी जास्त होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या काळात पाकिस्तान केवळ ओव्हरफ्लाइट शुल्कातून दररोज सुमारे 2,32,000 डॉलर गमावत होता. जर लँडिंग व पार्किंग शुल्क मिळवले, तर ही रक्कम 3,00,000 डॉलर पर्यंत जात होती.
त्याव्यतिरिक्त, PIA ला आंतरराष्ट्रीय मार्ग बंद व देशांतर्गत मार्गांवरील वेळ वाढल्यामुळे दररोज जवळपास 4,60,000 डॉलरचे नुकसान होत होते.
मिळून, CAA आणि PIA ला दररोज सुमारे 7,60,000 डॉलरचे नुकसान होत होते. त्या कालावधीच्या अखेरीस, पाकिस्तानचे एकूण नुकसान जवळपास 100 मिलियन डॉलरपर्यंत पोहोचले होते.
आता पहलगाम हल्ल्यानंतर आकाशमार्ग पुन्हा बंद केल्यामुळे पाकिस्तानचे पुन्हा नुकसानच होणार आहे. एअर इंडिया व इंडिगोच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांना याचा फटका बसणार आहे.
दिल्ली, अमृतसर, जयपूर, लखनौ व वाराणसीसारख्या शहरांमधून होणाऱ्या उड्डाणांवर थेट परिणाम झाला असून येथील उड्डाणांनंतर विमानांना आता लांबचा मार्ग घ्यावा लागत आहे. पाकिस्तानच्या आकाशातून जाण्याऐवजी ही विमाने आता अरबी समुद्राच्या मार्गाने जात आहेत.
एका वरिष्ठ वैमानिकाने PTI ला दिलेल्या माहितीनुसार अमेरिका व युरोपकडे जाणाऱ्या उड्डाणांना नव्या मार्गामुळे 2 ते 2.5 तास अधिक कालावधी लागतो आहे. याचा अर्थ अधिक इंधन खर्च, कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढले, उशीर असा तोटा होत आहे.