Pahalgam Attack: पाणी रोखाल तर 130 अणुबॉम्ब तयार ठेवलेत; पाकिस्तानच्या मंत्र्याची दर्पोक्ती
Pakistan Minister Hanif Abbasi threaten India of of Nuclear attack
जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने सिंधु पाणी वाटप करार, शिमला कराराला स्थगिती दिली. तर पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र भारतासाठी बंद केले.
आता भारत पाकिस्तानाला धडा शिकविण्याच्या तयारीत असतानाच पाकिस्तानच्या मंत्र्याने चक्क भारतालाच अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे.
पाकचा मंत्री हनिफ अब्बासी काय बरळला?
पाकिस्तानचे मंत्री हनिफ अब्बासी यांनी भारताला उघडउघड अणुहल्ल्याची धमकी दिली. पाकिस्तानकडे असलेली घोरी, शाहीन आणि गजनवी ही क्षेपणास्त्रे आणि 130 अणुबॉम्ब फक्त भारतासाठीच ठेवले आहेत.
जर भारताने सिंधू जल करार थांबवून पाकिस्तानचा पाण्याचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला, तर भारताला पूर्ण युद्धासाठी तयार राहावं लागेल.
पाकिस्तानची अण्वस्त्रं प्रदर्शनासाठी ठेवलेली नाहीत, ती देशभर लपवून ठेवली असून कोणतीही चूक झाल्यास ती तत्काळ वापरण्यात येतील.
आमच्याकडे असलेली लष्करी साधनं, क्षेपणास्त्रं ही केवळ शोभेसाठी नाहीत. आमची अण्वस्त्रे कुठे आहेत, हे कुणालाही माहिती नाही. मी पुन्हा सांगतो, ही सगळी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं भारतावरच लक्ष ठेवूनच तयार केलेली आहेत," असा इशारा त्यांनी दिला.
अब्बासी म्हणतो- भारतीय विमान कंपन्या दिवाळखोरीत जातील...
भारताने पाण्याचा पुरवठा आणि व्यापार संबंध थांबवल्यानंतर अब्बासी यांनी दिल्लीचा उपहास करत सांगितले की भारत आता आपल्या निर्णयांचे गंभीर परिणाम समजू लागला आहे.
पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद केल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळाकडे लक्ष वेधत अब्बासी म्हणाले, "जर हे असंच दहा दिवस चाललं, तर भारतातील विमान कंपन्या दिवाळखोरीत जातील."
पाकिस्तान परिणाम भोगायला तयार...
पहलगाम हल्ल्याबाबत भारताने पाकिस्तानवर आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर अब्बासी यांनी भारतावर टीका केली आणि भारताने स्वतःच्या सुरक्षेतील अपयश झाकण्यासाठी पाकिस्तानवर खोटे आरोप केल्याचं म्हटलं आहे.
भारताने व्यापार संबंध थांबवल्यानंतर पाकिस्तानने त्याचे परिणाम भोगण्यासाठी तयारी सुरू केली आहे आणि कोणतीही आर्थिक कारवाई झेलण्यास इस्लामाबाद तयार आहे.
हल्ल्यानंतर भारत सरकारने उचललेली पावले
भारताच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 26 जणांचा बळी गेल्यानंतर भारतभरातून या हल्ल्याचा निषेध नोंदवला जात असून याचा बदला घ्यावा, अशी भावना जनमानसांतून व्यक्त होत आहे. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात पावलं उचलली होती.
यामध्ये 1960 च्या सिंधू जलसंधीचा निलंबन आणि पाक नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द करण्याचा निर्णय यांचा समावेश होता.
पाकिस्तानच्या नागरिकांना 48 तासांत देश सोडण्यास सांगितले, त्यांच्या अधिकाऱ्यांनाही देश सोडण्यास सांगितले आहे. दोन्ही देशात तणाव वाढत आहेत. सीमेवरही छोट्या चकमकी झडत असताना आता पाकिस्तानच्या मंत्र्याने केलेल्या वक्तव्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
पाकच्या संरक्षण मंत्र्याची दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याची कबुली
अब्बासींच्या विधानांपूर्वीच पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी काही धक्कादायक दावे केले होते.
एका मुलाखतीत आसिफ यांनी कबूल केलं की पाकिस्तान गेली तीन दशके दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण देत होता आणि यात अमेरिका, पश्चिम देश आणि ब्रिटनचाही सहभाग होता.
"गेल्या तीस वर्षांत आम्ही अमेरिका आणि पश्चिम देशांसाठी हे घाणेरडं काम केलं," असं आसिफ म्हणाले. त्यांनी हेही मान्य केलं की ही एक चूक होती ज्यामुळे पाकिस्तानला फार मोठं नुकसान सहन करावं लागलं.
"जर आम्ही सोव्हिएत युनियनविरोधात युद्धात आणि नंतर 9/11 नंतर सामील झालो नसतो, तर आज पाकिस्तानचा इतिहास निष्कलंक राहिला असता," त्यांनी स्पष्ट केलं.
पहलगाम हल्ला भारतानेच रचल्याचा आरोप
आसिफ यांनी भारतावरच पहलगाम हल्ल्याचा "नाट्यपूर्ण कट" आखल्याचा आरोप केला आहे. हा हल्ला भारतानेच घडवून आणला होता, जेणेकरून पाकिस्तानविरोधात वातावरण निर्मिती करता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी सांगितलं की लष्कर-ए-तोयबा संघटना आता अस्तित्वात नाही आणि "द रेसिस्टन्स फ्रंट" या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेल्या गटाबद्दल त्यांनी कधीच ऐकलं नाही. आमच्या सरकारने पहलगाम हल्ल्याचा स्पष्टपणे निषेध केला आहे," असंही त्यांनी नमूद केलं आहे.

