

Pahalgam Attack Update
इस्लामाबाद: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या निर्णायक आणि आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये मोठी घबराट पसरली आहे.
देशातील राजकीय आणि लष्करी नेतृत्वही अस्वस्थ असून, त्यांचे कुटुंबीय परदेशी स्थलांतर करत आहेत. तर भारतात पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही, असा स्पष्ट संदेश जनतेकडून केंद्र सरकारला दिला जात आहे.
भारताने घेतलेल्या निर्णयांमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांपासून ते नेत्यांपर्यंत अनेकांनी भीतीपोटी देश सोडण्यास सुरुवात केली आहे.
एका माहितीनुसार पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या कुटूंबियांनी देश सोडल्यानंतर आता बिलावल भुट्टो यांच्या कुटूंबियांनी देखील पाकिस्तान सोडून कॅनडात पलायन केले असल्याचे समजते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने 1960 पासून अस्तित्वात असलेला सिंधू जलवाटप करार तात्पुरता स्थगित केला. यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पाकिस्तानमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे तेथील विविध नेत्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात जाण्यास सुरवात केली आहे.
पीपीपी पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी नुकतेच भारताला धमकी दिली होती की, "पाणी रोखल्यास रक्ताचे पाट वाहतील" परंतु, त्यांच्या या वक्तव्याला 24 तास होण्याच्या आतच त्यांच्याच कुटुंबातील बख्तावर भुट्टो आणि असीफा भुट्टो यांनी पाकिस्तान सोडून कॅनाडाला पलायन केल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानातील केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर पाकिस्तानच्या लष्करातीलही अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना देशाबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यात पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांनी खासगी जेटच्या माध्यमातून कुटुंबियांना ब्रिटन आणि अमेरिकेतील न्यू जर्सी येथे हलवलं आहे.
पहलगाम हल्ल्याच्या अवघ्या काही तासांत भारताने INS सूरत युद्धनौकेवरून एक क्षेपणास्त्र चाचणी केली. हा निर्णय पाकिस्तानला दिलेला स्पष्ट इशारा मानला जात आहे. तसेच रविवारी 27 एप्रिल रोजीही अरबी समुद्रातील युद्धनौकेवरून भारताने क्षेपणास्त्र चाचणी घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही "दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना कठोर शिक्षा दिली जाईल. ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात लपलेले असले, तरी त्यांना शोधून काढलं जाईल." असे वक्तव्य केले होते.
देशात संतापाचे वातावरण, विरोधकांचाही सरकारला पाठिंबा
26 जणांचा बळी घेतलेल्या पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. नागरिक सोशल मीडियावर, रस्त्यांवर आणि बातम्यांतून पंतप्रधान मोदींकडून पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
यावर सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने पंतप्रधान मोदींच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. विरोधकांनी स्पष्ट केलं आहे की, "सरकार कोणतंही पाऊल उचलो, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत."
सिंधू जल वाटप करार तात्पुरता स्थगित
शिमला कराराला स्थगिती
पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द
भारतातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश
डिप्लोमॅटिक अधिकाऱ्यांमध्ये मोठी कपात
सैन्याची हालचाल आणि युद्ध सज्जतेसाठी तयारी