अयोध्या; वृत्तसंस्था : अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिरातील गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. १५ जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ होणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राम मंदिर निर्माण समितीच्या पदाधिकार्यांनी मंदिरातील कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. आजच्या बैठकीत सोहळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. मुख्य सोहळ्यात अर्थात रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मूर्ती आणि ग्राऊंड फ्लोअरच्या कामाचा आढावा शनिवारच्या बैठकीत घेण्यात आला. ग्राऊंड फ्लोअरमध्ये फरशी बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
मंदिरातील मुख्य दरवाजे आणि खांबांवर मूर्तींच्या नक्षीकामाचेही काम वेगाने सुरू आहे. पहिल्या मजल्यावरील १४ दरवाजे तयार झाले आहेत. दरवाजे आणि खांबांवरील देव-देवतांच्या नक्षीकामाचे काम सुरू आहे. हैदराबाद येथील कारागिरांकडून नक्षीकाम केले जात आहे. १५ जानेवारी ते मार्च २०२४ पर्यंत अयोध्येत एक कोटीहून अधिक भाविक रामलल्लाचे दर्शन घेतील, अशी माहिती समितीतील पदाधिकार्यांनी दिली. भाविकांची संख्या ५ कोटींपर्यंत वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. समितीच्या बैठकीस विहिंपचे अध्यक्ष आलोककुमार, उपाध्यक्ष जीवेश्वर मिश्रा, राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय उपस्थित होते.
हेही वाचा :