नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
Coronavirus Updates : देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने दैनंदिन कोरोनाबाधितांचा आलेख उंचावला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३,२७५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १९,७१९ वर पोहोचली आहे. दिवसभरात ३,०१० रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत देशात ५ लाख २३ हजार ९७५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
याआधी मंगळवारी दिवसभरात ३ हजार २०५ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ३१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, २ हजार ८०२ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७४ टक्के, तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.९८ टक्के नोंदवण्यात आला होता.
कोरोनाविरोधात (Coronavirus Updates) सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८९ कोटी ६३ लाख ३० हजार ३६२ डोस देण्यात आले आहेत. यातील २.९५ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाचा वाढता प्रकोप लक्षात घेता खबरदारी म्हणून २ कोटी ८६ लाख ९१ हजार ७६२ बूस्टर डोस देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १८ कोटी ९६ लाख ४ हजार ८२५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.
सन् २०२० मध्ये मृत्यू प्रमाणात झालेल्या वाढीमागे केवळ कोरोना कारणीभूत नव्हता, असे प्रतिपादन नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना केले. कोरोना मृत्यूचे सरकारकडून जे आकडे सांगितले जात आहेत, त्यापेक्षा कितीतरी जास्त मृत्यू या विषाणूने घेतले असल्याचा दावा काही संस्था करीत आहेत. सदर संस्थांनी हे दावे थांबवावेत, असेही पॉल यांनी नमूद केले.
जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीत कोरोनाने पडलेले बळी सरकारी आकड्यांपेक्षा आठपटीने जास्त असल्याचे लॅन्सेट नावाच्या संस्थेने काही दिवसांपूर्वी सांगितले होते, त्याचा दाखला पॉल यांनी दिला. वरील कालावधीत सरकारने कोरोना बळींचा आकडा ४ लाख ८९ हजार इतका दिला होता. तर लॅन्सेटने भारतातले कोरोना बळी जगात सर्वाधिक असल्याचा दावा केला होता.
हे ही वाचा :