पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने हा विजय संपादन केला. गेल्यावर्षी भारतीय संघाला पाकिस्तानकडून लाजीरवाना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आज पाकिस्तानचा पराभव करून टीम इंडियाने बदला घेतला असल्याचे बोलले जात आहे. (IND vs PAK)
दरम्यान, आजचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील पाहत होते. भारताच्या या दमदार विजयानंतर शरद पवारांनी जोरदार सेलीब्रेशिनही केले. सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांचा सेलीब्रेशन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडीयावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सुप्रिया सुळे यांनी "आनंदी रविवार केल्याबद्दल टीम इंडियाचे धन्यवाद" असे या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे. (IND vs PAK)
आजचा आशिया चषकातील दुसरा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावरती खेळवला गेला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर पाकिस्तानला सर्वबाद १४७ धावांपर्यंत रोखण्यात भारतीय संघाला यश आले. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४, हार्दिक पंड्याने ३ तर अर्शदीप सिंगने २ विकेट्स पटकावल्या. (IND vs PAK)
पाकिस्तानने दिलेल्या १४८ धावांच्या आव्हानाचा सामना करताना भारतीय संघाने सावध सुरूवात केली होती. विराट कोहली ३४ चेंडूमध्ये ३५ धावा, रविंद्र जडेजा २९ चेंडूमध्ये ३५ धावा आणि हार्दिकने केलेल्या १७ चेंडूमध्ये ३३ धावांच्या केलेल्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानवर दिमाखदार विजय मिळवला. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाझने ३ तर नसीम शाहने २ विकेट्स पटकावल्या. (IND vs PAK)