विहिरीत उडी मारेन; पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही: नितीन गडकरींनी पुन्‍हा सांगितला ‘ताे’ किस्‍सा | पुढारी

विहिरीत उडी मारेन; पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही: नितीन गडकरींनी पुन्‍हा सांगितला 'ताे' किस्‍सा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विहिरीत उडी मारेन, पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही, या वक्तव्याची आठवण करून देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा नागपुरातील एका कार्यक्रमात त्यांचा हा किस्सा सांगितला. गडकरी यांनी तत्कालीन अर्थमंत्री डॉ. श्रीकांत जिचकार यांना दिलेले हे उत्तर होते.

नितीन गडकरी त्यांच्या तरुण वयात विद्यार्थी चळवळीत काम करीत होते. त्यावेळी काँग्रेसचे नेते श्रीकांत जिचकार यांनी त्यांना चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करा, असे सांगितले होते. त्यावेळी श्रीकांत जिचकार यांना दिलेले उत्तर गडकरींनी या कार्यक्रमात सांगितले.त्यावेळी ते श्रीकांत जिचकार यांना म्हणाले होते की, मी विहिरीत उडी मारुन मरुन जाईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. कारण काँग्रेसची विचारधारा आपल्याला पसंत नाही. नागपुरात उद्योजकांच्या एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

यावेळी बोलताना गडकरी यांनी तरुण उद्योजकांना मार्गदर्शन केले. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, असा सल्ला गडकरींनी या उद्योजकांना दिला. निक्सन यांच्या आत्मचरित्रातील पराभवानंतर माणसाचा अंत होत नाही. मात्र, त्याने स्वत: जर हा पराभव मान्य केला, तर तो संपतो, हे वक्तव्य कायम स्मरणात ठेवण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी सध्याच्या वापरा आणि फेकून द्या, या संस्कृतीचा भाग होऊ नका, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.

मैत्री केली असेल, तर तो हात सोडू नका

गडकरी म्हणाले की, जे कोणी व्यवसायात आहेत, सामाजिक कार्यात आहेत किंवा राजकारणात आहेत, त्यांच्यासाठी इतर माणसांशी त्यांचे असलेले संबंध ही सर्वात मोठी ताकद आहे. एखाद्याचे चांगले दिवस असो वा वाईट दिवस असो, जेव्हा तुम्ही कुणाचा हात हातात घेतला असेल. म्हणजेच त्या माणसाशी मैत्री केली असेल, तर तो हात सोडू नका, असा सल्ली यावेळी गडकरी यांनी उपस्थित उद्योजकांना दिला. प्रत्येक वेळी उगवत्या सूर्यालाच नमस्कार करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button