धर्मशाळा; वृत्तसंस्था : यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारत आणि न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघांमध्ये धर्मशाळाच्या मैदानावर महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. दोन्ही संघ स्पर्धेत अजय असून यापैकी एकाचा विजयरथ थांबणार आहे. न्यूझीलंड संघ गुणतालिकेत सध्या पहिल्या स्थानावर आहे तर भारत दुसर्या स्थानावर आहे. विजेता संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेईलच, पण तो सेमीफायनलचे तिकीटही जवळपास निश्चित करेल. विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेत गेल्या वीस वर्षांपासून भारताला किविजवर मात करता आलेली नाही. (IND vs NZ)
न्यूझीलंड आणि भारत या दोघांनीही आपल्या पहिल्या चार सामन्यांत एकतर्फी विजय मिळवला आहे. दोघांचेही समान गुण असले तरी निव्वळ धावगती सरस असल्याने, न्यूझीलंड अव्वल क्रमांकावर आहे. भारत गुणतालिकेत दुसर्या स्थानावर आहे. दोन्ही संघांत चुरशीची लढत होईल, यात शंकाच नाही. (IND vs NZ)
येथील एचपीसीए स्टेडियम वेगवान गोलंदाजांना मदत करते हे खरे असले तरी खेळपट्टी फलंदाजांसाठीही पोषक आहे. अन्य मैदानांपेक्षा हे मैदान लहान आहे, त्यामुळे येथे चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे. इथल्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना फारशी संधी नाही. मात्र, वेगवान गोलंदाजांना त्यांच्या कौशल्याचा फायदा घेता येईल.
सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात या मैदानावर आतापर्यंत 3 सामने झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 364 धावा आहेत. सर्वात कमी धावसंख्या आहे 156. याशिवाय पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 231 असून दुसर्या डावाची सरासरी आहे 199 धावा. मैदानावर दव पडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे दुसर्या डावात फलंदाजी करणार्या संघाला अधिक फायदा होतो. साहजिकच नाणेफेक जिंकलेल्या संघाचा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल असे दिसते.
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ सध्या बलाढ्य आहेत. आतापर्यंत हे विश्वचषकात सहभागी झालेल्या सर्व 10 संघांना साखळीत प्रत्येकी 9 सामने खेळायचे आहेत. याआधीचा इतिहास पाहिला तर 5 किंवा 6 सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याशिवाय, या दोन्ही संघांची निव्वळ धावगतीही सर्वोत्तम आहे.
1975 (इंग्लंड) न्यूझीलंड 4 गड्यांनी विजयी
1979 (इंग्लंड) न्यूझीलंड 8 गड्यांनी विजयी
1987 (भारत) टीम इंडिया 16 धावांनी विजयी
1987 (भारत) टीम इंडिया 9 गड्यांनी विजयी
1992 (ऑस्ट्रेलिया) न्यूझीलंड 4 गड्यांनी विजयी
1999 (इंग्लंड) न्यूझीलंड 5 गड्यांनी विजयी
2003 (दक्षिण आफ्रिका) भारत 7 गड्यांनी विजयी
2019 (इंग्लंड) न्यूझीलंड 18 धावांनी विजयी
(अन्य विश्वचषक स्पर्धांत दोन्ही संघ समोरासमोर आले नाहीत.)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार धर्मशाला येथे रविवारी दुपारच्या सुमारास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नाणेफेकीला विलंब होऊ शकतो. या ठिकाणी दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यातील याआधीच्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला होता. तो सामना 43 षटकांपर्यंत कमी करण्यात आला होता. येथील कमाल तापमान 13 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. (IND vs NZ)
आतापर्यंतचे सामने : 116
भारत विजयी : 58
न्यूझीलंड विजयी : 50
निकाल नाही : 7
बरोबरीत सामने : 1
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकिपर), डॅरियल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिशेल सँटेनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
हेही वाचा :