छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सणासुदीनिमित्ताने बाजारात विक्रीसाठी आलेला तब्बल १ लाख ५७ हजार रुपये किंमतीचा भेसळयुक्त मिठाई व बर्फीचा साठा शनिवारी (दि.२१) अन्न व औषधी प्रशासन आणि गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केला. सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या कारवाईत तब्बल १ हजार ४८ किलो नकली मिठाई ताब्यात घेतली आहे. शुक्रवारी भेसळयुक्त मिठाई बनविणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता. याच कारखान्यात उत्पादीत नकली मिठाई विक्रीसाठी ठेवली होती.
दरवर्षी दसरा-दिवाळीत मिठाई, खवा, मावा, बर्फी, नमकीन आदी खाद्यपदार्थांना मागणी वाढते. त्यामुळे या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. हे प्रकार रोखण्यासाठी व ग्राहकांना सुरक्षित व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषधी प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरु आहे. याअंतर्गत शुक्रवारी (दि.२०) शहराच्या उस्मानिया कॉलनी, मिटमिटा येथे भेसळयुक्त मिठाई व बर्फी बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत नकली मिठाईसह स्किम्ड मिल्क पावडर, रवा, साखर असा तब्बल १२ लाख ८ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला होता. आज (दि. २१) कैलासनगर भागातील मे. जोधपूर मिष्ठान भांडार येथे छापा टाकत बर्फीसारख्या गोड अन्न पदार्थाचा तब्बल 1 हजार 048 किलो, आणि 1 लाख 57 हजार 200 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
ही कारवाई अन्न प्रशासन सहआयुक्त अजित मैत्रे व गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी निखिल कुलकर्णी, गुन्हे शाखा उपनिरीक्षक संदीप सोळंके, विशाल बोडखे, पोह.संजय मुळे, संदीप तायडे, अंमलदार नवनाथ खांडेकर, सुनील बेलकर, शाम आडे, अमोल शिंदे, राहुल खरात, दादासाहेब झारगड, राजेंद्र चौधरी, अजय दहीवाल, ज्ञानेश्वर पवार यांचा सहभाग होता.