चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आलेल्या पूरात एका पाळीव कुत्र्याला दगड बांधून पूरातील पाण्यात ढकलून जिवे मारण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. रविवारी (दि. १७) रोजी कुत्र्याला पूरात ढकलत असताना काही तरूणांनी व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर पर्यावरण प्रेमींनी व्हिडिओ बघून या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. पर्यावरण प्रेमींनी व्हिडिओ बघून हा प्रकार शोधून काढला असून चंद्रपूर शहराला लागून असलेल्या बल्लारपूर तालुक्यातील दहेली येथील असून हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असल्याचे बोलले जात आहे. याबाबत प्यार फाउंडेशनने पोलिसात तक्रार करून आवाज उठविला आहे. सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
रविवारी एका लाल रंगाच्या कुत्र्याला दगड बांधून पूरातील पाण्यात ढकलून मारण्याची योजना काही तरूणांनी आखली होती. या योजनेनुसार काही तरूणांनी एका कुत्र्याला नाल्याच्या शेजारी नेवून त्याच्या गल्यात दगड बांधून पुराच्या पाण्यात ढकलून दिले. या प्रकाराचा व्हिडिओ काही इतर तरूणांनी तयार करून तो व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच पूरात आणून ढकलण्यापूर्वी इंजेक्शन देवून पाळीव कुत्र्याला मारता आले असते असे प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटत आहेत.
या व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणच्या नाल्याला पूर आल्याचे दिसून येत आहे. दगड बांधून कुत्र्याला पूरातील पाण्यात ढकलण्यात आले. परंतु, तो पाळीव असल्याने पुरातून जीव वाचवून बाहेर परत आल्याचेही दिसून येत आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर त्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यानंतर प्यार फाउंडेशनचे या प्रकाराचा निषेध व्यक्त केला असून पोलिसात तक्रार केली आहे. घडलेल्या या घटनेबाबत आवाज उठविला आहे.
घराचा राखणदार म्हणून घरोघरी कुत्रा पाळला जातो. त्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे ठेवले जाते. त्याची इमानदारीचे अनेकदा दाखलेही दिले जातात. कुत्रा हा आपल्या मालकाशी प्रामाणिक असतो. मात्र, या प्राण्याला पुरात ढकलून मारण्याचा प्रकार हा माणुसकीला काळीमा फासणारा असल्याने सर्वत्र या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बल्लारपूर तालुक्यातील दहेली येथे एका कुटुंबियांनी हा प्रकार घडवून आल्याची खात्री पटली आहे. प्यार फाउंडेशनचे पोलिसात तक्रार केली आहे. यानंतर पोलिस या घटनेबाबत काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नदी -नाले पूराने भरभरून वाहत आहेत. धरणे तुडूंब भरले आहेत. शेतात पाणी साचले आहे. ठिकठिकाणी नागरिक पूरात अडकले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टिम जिवाची पर्वा न करता नागरिकांना पूरात बाहेर काढण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत. याच पुरातील पाण्यात एका पाळीव कुत्र्याला जिवानीशी मारण्याचा प्रयत्न माणूसकीला काळीमा फासणारा असल्याची प्रतिक्रिया प्राणी प्रेमी व्यक्त करीत आहेत.
हेही वाचलंत का?