सलग आठ दिवसांपासून बारामती तालुक्यात संततधार सुरू | पुढारी

सलग आठ दिवसांपासून बारामती तालुक्यात संततधार सुरू

बारामती; पुढारी वृत्तसेवा: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बारामती तालुक्यात सोमवारी (दि.18) रोजी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर कमी असला, तरीही दिवसभराच्या पावसामुळे शेतातील कामाचा खोळंबा झाला. मागील आठवड्यात सलग आठ दिवसांपासून तालुक्यात संततधार सुरू होती. शनिवार आणि रविवारी उसंत घेतलेल्या पावसाने सोमवारी सकाळपासूनच सुरुवात केली. सततच्या पावसामुळे पिकांवर रोगराई वाढली आहे. बारामती तालुक्यात अजूनही पेरण्या रखडल्या आहेत.

तर, उपलब्ध पाण्यावर अनेक शेतकर्‍यांनी बाजरी, सोयाबीन आदी पिकांसह तरकारी पिके घेतली आहेत. सततच्या पावसामुळे ग्रामीण भागातील नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, थंडी, ताप, खोकला आदी लक्षणे रुग्णांना आढळून येत आहेत. हवामान विभागाने पुढील चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतातील कामे उरकण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. संततधार पावसामुळे वन्यप्राण्यांचा पाण्याचा आणि जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न मार्गी लागला आहे. नीरा नदीला वीर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने बारामतीच्या पश्चिम भागातील बंधार्‍यात पाणीसाठा वाढला आहे. मात्र, मुसळधार पाऊस झाला नसल्याने या परीसरातील ओढे, नाले, विहिरी, तलाव अजूनही कोरडेच आहेत.

Back to top button