पुढारी ऑनलाईन डेस्क :
अंडर-19 वर्ल्ड कप ( १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा ) मध्ये टीम इंडियाने दमदार खेळीचे प्रदर्शन करत सेमिफायनलमध्ये धडक मारली आहे. आज टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी मुकाबला करेल. विशेष म्हणजे, यास्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ विजेतेपद पटकावतील, असे अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे आजचा सामना हा फायनल सारखाच रंगतदार होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी ६ वाजता सुरु होणार्या सामन्याकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष वेधले आहे.
बांगलादेशला धूळ चारत टीम इंडिया मोठ्या दिमाखात सेमीफायनलमध्ये पोहचली आहे. आज यश धुल याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानात उतरेल. टीम इंडियाने १९ वर्षांखालील विश्चषक स्पर्धेत सलग चारवेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी २०१६, २०१८ आणि २०२० च्या स्पर्धेत टीम इंडियाने सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती. २०१८चा अंडर-19 वर्ल्ड कप भारताने जिंकला. तर २०१६ आणि २०२०मध्ये भारतीय संघाचा फायनलमध्ये पराभव झाला होता. टीम इंडियाने तब्बल ८ वेळा अंडर-19 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. तर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत केवळ तीन वेळाच जेतेपद पटकावले आहे.
पाकिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलियाच्या संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सराव सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या स्पर्धेत यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे सातवेळा आमने-सामने आले. यातील ५ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. आकडेवारीचा विचार करता भारताची बाजू सरस आहे. निशांत सिंधु हा कोरानामुक्त झाला आहे. मात्र अखेरच्या षटकांमधील फलंदाजी सुधारण्याचे आव्हान संघासमोर कायम आहे.
यंदाच्या अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. क्वार्टर सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजांनी ७१ चेंडूत ९७ धावा ठोकल्या. आता ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजांना रोखण्यासाठी भारताला रणनीती आखावी लागणार आहे.
भारतीय संघात हरनूर सिंह, रघुवंशी, राज बावा, यश आणि रशीद असे प्रतीभावंत फलंदाज आहेत. रघुवंशी याने आतापर्यंत चार सामन्यांमध्ये एक शतक ठाेकत २७२ धावा फटकावल्या आहेत. या स्पर्धेतील तो भारताचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला आहे. तर बावा याने २१७ धावा केल्या आहेत. पहिल्याच सामन्यात दमदार ८२ धावांची खेळी करणारा यश याने स्पधेंत एकुण १०२ धावा केल्या आहेत. विक्की ओस्तवाल याने स्पर्धेत चार सामन्यांमध्ये एकुण ९ बळी घेतले आहेत. तर रवि कुमार याने बांगलादेशविरुद्धच्या क्वार्टर सेमीफायनलमध्ये पाच षटकांमध्ये १४ धावा देत तीन बळी घेतले होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडेही असणार आहे.
कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्ष खेळाडूंच्या सरावाला माेठा फटका बसला. मागील दोन वर्ष राष्ट्रीय शिबिर झालेले नाही. तसेच कोणतीही मोठी स्पर्धेचे आयाोजनही झाली नाही. भारतीय संघाटने एशिया कपमध्ये सहभाग घेतला होता. यानंतर थेट अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेतच सहभाग घेतला. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करत भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. यानंतर अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. आर्यलंडविरोधातील सामन्यांत ११ खेळाडूंची जमावाजमव करतानाही टीम इंडियाला मोठा संघर्ष करावा लागला. कर्णधार यश, उपकर्णधार शेख रशीद, आराध्य यादव, मानव पारख आणि सिद्धार्थ यादव हे महत्त्वाचे पाच खेळाडू या सामन्यात सहभागी होवू शकले नाहीत. यामुळे बीसीसीआयला पर्यायी खेळाडू दक्षिण आफ्रिकेला पाठवावे लागले. सहा राखीव खेळाडूंसह मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने आर्यलंड आणि युगांडा विरोधातील सामने जिंकले. आता कोरोनाला मात देत खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. आज ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात त्याची कसोटी लागणार आहे.
हेही वाचलं का?