Latest

ICC ODI WC 2023 : माझा नंबर पहिला

Shambhuraj Pachindre

विश्वचषकाच्या साखळी सामन्यांच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत, तरी प्रत्येक सामन्याला काही ना काही महत्त्व आहे. कुणाला या विश्वचषकात उपांत्य फेरी गाठायची आहे, तर कुणाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरायचे आहे. थोडक्यात काय कुठल्या ना कुठल्या रँकिंगच्या बातम्या सतत कानावर पडत आहेत. 'आयसीसी'चे रँकिंग असते तो एक वेगळाच प्रकार आहे. परवा 'आयसीसी'च्या एक दिवसीय क्रिकेटच्या रँकिंगमध्ये भारताच्या शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांनी अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीत पहिला क्रमांक मिळवला. कुणाला प्रश्न पडेल इथे कोहली दोन शतके, दोन अर्धशतके ठोकून खेळतोय, रोहित शर्मा चांगला खेळतोय तर अचानक शुभमन गिलचे रँकिंग अव्वल कसे झाले, जो पहिले दोन सामने डेंग्यूमुळे खेळलाही नव्हता. त्याचप्रमाणे सिराजच्या मार्‍याची धार श्रीलंकेविरुद्धच्या सामान्यापासून वाढली असता तो 'आयसीसी'च्या रँकिंगमध्ये अव्वल कसा झाला? 'आयसीसी'मध्ये माझा नंबर पहिला कसा जाहीर होतो? ही विविध रँकिंग आणि त्याने काय साधले जाते याचा आपण आढावा घेतला, तर यावर प्रकाश पडेल. (ICC ODI WC 2023)

सर्वप्रथम या विश्वचषकाबाबत बोलायचे तर गुरुवारच्या न्यूझीलंड-श्रीलंका सामन्याच्या आधीपर्यंत इंग्लंड, बांगला देश, श्रीलंका आणि नेदरलँड हे अनुक्रमे सात ते दहा स्थानांवर होते. या चार संघांचा पहिल्या आठ स्थानात यायचा आटापिटा आहे, तो 2025 च्या पाकिस्तानात होणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रतेसाठी. 'आयसीसी'ने खरं तर 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर ही स्पर्धा बंद केली होती. 2021 चे यजमान भारत होते; पण भारताचे नुकसान होऊ नये म्हणून एक जादाचा टी-20 विश्वचषक खेळला गेला. भारत यजमान होता, पण कोरोनामुळे तो दुबईला खेळला गेला. 2024 -2031 च्या 'आयसीसी' कॅलेंडरमध्ये पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी अवतरली आहे. पन्नास षटकांच्या विश्वचषकाच्या चार वर्षांमध्ये ही चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जायची; पण पन्नास षटकांच्या क्रिकेटची घटती लोकप्रियता बघून ही बंद केली गेली. आता 'आयसीसी'ला दिसून आले आहे की, पन्नास षटकांच्या क्रिकेटला मरण नाही. पूर्वी 'आयसीसी'च्या रँकिंगनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघांची निवड व्हायची. जी शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये 2017 ला खेळवली गेली त्यात पात्र ठरण्यासाठी 30 सप्टेंबर 2015 रोजी 'आयसीसी'च्या एक दिवसीय क्रिकेटच्या रँकिंगमधले पहिले आठ संघ पात्र ठरले होते. आता 'आयसीसी'ने चॅम्पियन्स ट्रॉफीचे पुनरुत्थान केल्यावर 2025 च्या स्पर्धेसाठी यजमान पाकिस्तान सोडून 2023 च्या विश्वचषकातले पहिले सात संघ पात्र ठरणार आहेत. या विश्वचषकात सध्या तळात असलेल्या संघांसाठी हे खरे तर अन्यायकारक आहे. आजही एक दिवसीय क्रिकेटचे 'आयसीसी'चे रँकिंग बघितले तर इंग्लंड 6 व्या, श्रीलंका 7 व्या, बांगला देश 8 व्या, तर अफगाणिस्तान 9 व्या स्थानावर आहे. या चालू असलेल्या विश्वचषकाच्या गुणतक्त्यानुसार अफगाणिस्तान पात्र ठरले आहे, तर इंग्लंड पात्र व्हायचा आटापिटा करत आहे. चँम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पात्रतेआधी आपण चालू असलेल्या 2023 च्या विश्वचषकाची पात्रता कशी होते, ते बघू या. 2020-23 मध्ये 'आयसीसी सुपर लीग'मध्ये यजमान भारत सोडून जे संघ क्रमवारीत पहिल्या सात स्थानावर होते ते आपोआप पात्र झाले आणि श्रीलंका व नेदरलँड पात्रता फेरीतून आले. चॅम्पियन्स ट्रॉफीचे पात्रता निकष आता 'आयसीसी' रँकिंग नसल्यामुळे वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, स्कॉटलंड, आर्यलंड या संघांना चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायचे स्वप्नही बघता येणार नाही. कारण, ते मुळात या विश्वचषकालाच पात्र ठरले नाहीत. यात वाईट वाटते ते वेस्ट इंडिजचे. त्यांचा संघ अनेक अडचणींना तोंड देत आहे. एकेकाळच्या देदीप्यमान परंपरेच्या वेस्ट इंडिजमधले क्रिकेट टिकायला हवं असेल, तर 'आयसीसी'ला आपल्या नियमात बदल करणे गरजेचे आहे. नेदरलँड पात्रता फेरीतून इथेपर्यंत आले तेव्हा त्यांचे कौतुक आहे; पण आतापर्यंत झालेल्या सामन्यांचा विचार करता वेस्ट इंडिज आहे त्या स्थितीत काही संघांना नक्कीच नेदरलँडपेक्षा जास्त तुल्यबळ ठरले असते. 'आयसीसी' जे एक दिवसीय सामन्यांचे रँकिंग करते त्यात जे दोन संघ एकदिवसीय सामना खेळतात त्यांना एका गणिती सूत्राने गुण दिले जातात. प्रत्येक संघाच्या गुणांना त्यांच्या एकूण खेळलेल्या सामन्यांच्या संख्येने भागले जाते आणि त्यातून हे रँकिंग जन्माला येते. 'आयसीसी' जेव्हा एखाद्या खेळाडूचे रँकिंग तयार करते तेव्हा खेळाडूच्या एकूण कामगिरीचा अभ्यास करते; पण त्यात ताज्या सामन्यांना जास्त गुणांकन दिले जाते ज्याला सांख्यिकी शास्त्रात 'वेटेड अ‍ॅव्हरेज मेथड' म्हणतात. प्रत्येक सामन्यातील कामगिरीला वेगवेगळ्या विभागानुसार 1000 पैकी गुण दिले जातात. फलंदाजांची क्रमवारी लावताना एकूण धावा, प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजांचे रँकिंग, सामन्याचा निकाल आणि एकूण धावांशी तुलना करून गुणांकन केले जाते, तर गोलंदाजाची क्रमवारी लावताना त्याने घेतलेले बळी, दिलेल्या धावा, सामन्याचा निकाल हे विचारात घेतले जाते. जर गोलंदाजाने उच्च क्रमवारीच्या फलंदाजाला बाद केले, तर त्याला त्याचे जास्त गुण मिळतात. आता आपण गिल आणि सिराजची कामगिरी या प्रमुख गोष्टींसाठी तपासली, तर आपल्याला या रँकिंगच्या कोड्याचे गणित सुटू शकेल. कुठच्याही खेळात रँकिंग, क्रमवारी असणे गरजेचे असते. आपल्या लक्षात येईल 'आयसीसी'च्या रँकिंग सूत्रात अनेक घटक आणि मोठा कालावधी विचारात घेतला जातो. कुणाचाही एका दिवसाचा पराक्रम यामुळे बरोबर तोलला जातो. यामुळेच एखाद्या स्पर्धेच्या पात्रतेसाठी एका ठराविक स्पर्धेचा गुणतक्ता विचारात न घेता 'आयसीसी'ने एकूण रँकिंग विचारात घेतले पाहिजे, असेच वाटते. (ICC ODI WC 2023 )

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT