World Cup 2023 : पाकच्या डोक्यात धोंडा; 287 धावांनी किंवा 22 चेंडूंत जिंका | पुढारी

World Cup 2023 : पाकच्या डोक्यात धोंडा; 287 धावांनी किंवा 22 चेंडूंत जिंका

पुढारी वृत्तसंस्था : न्यूझीलंडच्या श्रीलंकेवरील विजयाने पाकिस्तानच्या डोक्यात धोंडा पडला आहे. वर्ल्डकपची (World Cup 2023) सेमीफायनल गाठण्याचा त्यांचा मार्ग अत्यंत खडतर झाला आहे. गुणतालिकेत न्यूझीलंड 0.743 असा नेट रनरेट आणि 10 गुणांसह चौथ्या स्थानावर मजबूत पाय रोवून उभे राहिले आहे. 8 गुण असलेल्या पाकिस्तानचा 0.036 असा नेट रनरेट आहे आणि त्यांना शेवटच्या लढतीत इंग्लंडविरुद्ध 287 धावांनी विजय मिळवावा लागेल किंवा 284 चेंडू राखून बाजी मारावी लागेल. इंग्लंडने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यास पाकिस्तानचे आव्हान संपेल. पाकिस्तानने 400 धावा केल्या आणि इंग्लंडला 112 धावांवर गुंडाळले तर ते पात्र ठरतील.

न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीसाठी जवळपास पात्रता मिळवली आहे. या विजयासह न्यूझीलंडचे गुणतालिकेत 10 गुण झाले आहेत. किवी संघाचा धावगतीही चांगला आहे. न्यूझीलंडच्या या विजयाने पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा जवळपास धुळीस मिळाल्या आहेत. आता एखादा चमत्कारही पाकिस्तानला २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत नेऊ शकत नाही. अफगाणिस्तानातील परिस्थिती पाकिस्तानपेक्षा वाईट आहे.

बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर गुरुवारी न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगला. या सामन्यापूर्वी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. सामन्यादरम्यान पाऊस पडला नसला, तरी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या संघावर नक्कीच कहर केला. उपांत्य फेरीसाठी जबरदस्त विजयाच्या शोधात असलेल्या न्यूझीलंड संघाने श्रीलंकेला अवघ्या 171 धावांत ऑलआउट केले.

उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना भारताशी होऊ शकतो (World Cup 2023)

उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना भारताशी होऊ शकतो. भारतीय संघ विश्वचषकाच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर राहण्याची शक्यता आहे. साखळी सामन्यातील पहिल्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांमधील पहिला उपांत्य सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.

न्यूझीलंडचा एक पाय सेमीफायनलमध्ये (World Cup 2023)

विश्वचषक 2023 ची उपांत्य फेरी गाठण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेला 5 विकेटस् आणि 160 चेंडू राखून हरवले. या विजयामुळे किवींनी सेमीफायनलमध्ये आपला एक पाय टाकला असून, त्यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्ताच्या मार्गात मोठा खड्डा खणला आहे. अफगाणिस्तानचा शेवटचा सामना आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, तर पाकिस्तानचा शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध उद्या (शनिवारी) होणार आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असल्यास अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांना आपल्या शेवटच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंडच्या धारदार गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यांनी 46.4 षटकांत सर्वबाद 171 अशा धावा केल्या. हे आव्हान न्यूझीलंडने 23.2 षटकांत पूर्ण केले. न्यूझीलंडकडून डेव्हन कॉनवे (45), डॅरिल मिशेल (43) आणि रचिन रवींद्रने (42) धावा केल्या. ट्रेंट बोल्ट सामनावीर ठरला.

Back to top button