Latest

अवकाळी पाऊस : कोल्हापूर १२० कोटी, सांगलीचे साडेतीन हजार कोटींचे नुकसान

निलेश पोतदार

सुनील कदम, अनिल देशमुख, संजीव कदम, जयंत धुळप, सूरज कोयंडे

कोल्हापूर / सांगली / सातारा / अलिबाग/ सिंधुदुर्ग / रत्नागिरी

सातारा जिल्ह्याला दीड हजार कोटींचा फटका

रत्नागिरीत काजू, आंब्याला 1300 कोटींचा तडाखा

सिंधुदुर्गातील देवगड हापूसची 600 कोटींची हानी

निसर्गाचे चक्र उलटे फिरू लागले की काय, अशी शंका येऊ लागली आहे. दर दोन-चार महिन्यांनी येणार्‍या नवनव्या संकटांनी बळीराजाला पार उद्ध्वस्त केले आहे. या आठवड्यात धुवाँधार कोसळलेल्या अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेती आणि शेतकर्‍यांची अपरिमित हानी केली आहे. एकट्या सांगली जिल्ह्याचे 3.5 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. सांगलीतील द्राक्षबागा निम्म्यापेक्षा जास्त गारद झाल्या आहेत. कोकणातील शेतकर्‍यांचेही अवकाळीने कंबरडे मोडले असून सुमारे 2.5 हजार कोटींचा फटका येथे बसला आहे. रत्नागिरीत आंबा आणि काजू बागांची हानी झाली असून नुकसानीचा हा आकडा सुमारे 1300 कोटींचा तर सिंधुदुर्गात देवगड हापूसला 600 कोटींचा फटका बसला आहे. सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी, डाळिंब आणि द्राक्षबागांना जोरदार तडाखा बसला असून हे नुकसान अंदाजे 1500 कोटींचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भात आणि ज्वारी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. साखर हंगामही लांबणीवर पडणार आहे. या जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा 120 कोटींच्या घरात आहे. दै. 'पुढारी' टीमने प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकर्‍यांची आजची स्थिती जाणून घेतली असता अत्यंत विदारक चित्र समोर आले. यापूर्वीच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. आता तर हाता-तोंडात आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे. त्यामुळे मेटाकुटीस आलेला बळीराजा आर्त स्वरात विचारतो आहे, 'हे मायबाप सरकार, सांगा आम्ही आता जगायचं कसं?'

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, भुदरगडला फटका

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या अवकाळी पावसाचा शेतकर्‍यांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील सुमारे 5 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. साखर हंगामही चार-पाच दिवस लांबणार आहे. गुर्‍हाळघरेही बंद आहेत. जिल्ह्यात अवकाळीने सुमारे 120 कोटींवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापूर्वी हिवाळ्यात अशा अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याची कुठलीही नोंद नाही.

गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. या तीन दिवसांत जिल्ह्यात सरासरी 57.74 मि.मी. पाऊस झाला आहे. डिसेंबर महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात

पाऊस पडण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ असावी, असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात इतक्या पावसाची नोंद यापूर्वी कधीच झालेली नाही.

पावसाने जिल्ह्यात आंबा पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. सध्या आलेला मोहोर खराब होण्याची शक्यता आहे. या पावसाने अनेक ठिकाणी मोहोर झडून गेला आहे. ज्या ठिकाणी मोहोर शिल्लक आहे, त्या ठिकाणी त्याची अपेक्षित वाढ होण्याची शक्यताही कमी आहे. यामुळे जिल्ह्यात आंबा उत्पादनात यंदा घट होणार आहे. पावसाने हवेतील आर्द्रता वाढल्याने पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भावही वाढणार आहे.

शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील द्राक्षांचे मोठे नुकसान

जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील द्राक्ष बागांचेही पावसाने मोठे नुकसान केले आहे. सुमारे 25 एकरातील बागा पावसाने उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामुळे द्राक्ष बागायदारांचे दोन-तीन कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यात भाजीपाल्याच्या शेतीवरही काहीसा परिणाम झाला आहे. शेतात पाणी साचल्याने काढणीसाठी आलेला भाजीपाला शेतातच कुजून गेल्याने जिल्ह्यात भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पावसाने गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील बहुतांशी गुर्‍हाळघरे पूर्णपणे बंद आहेत. यामुळे गुर्‍हाळघरांचेही आतापर्यंत सुमारे 5 ते 6 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुर्‍हाळघरे आणखी काही दिवस बंद राहण्याचीही शक्यता आहे. यामुळे हे नुकसान आणखी वाढण्याचीही भीती आहे.

अवकाळीचा जिल्ह्यातील साखर उद्योगाला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील साखर हंगाम आणखी पाच ते सहा दिवस पुढे गेला आहे. अवकाळीमुळे जिल्ह्यातील बहुतांशी ऊस तोडण्या बंद झाल्या आहेत.

जिल्ह्यात झालेल्या पावसाने साखर उतारा आणि साखर उत्पादनावरही परिणाम जाणवणार आहे. कारखान्यांच्या दैनंदिन खर्चात वाढ होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना सुमारे 25 ते 30 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. यासह जिल्ह्यात वीट व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामे सुरू झालेेले नाहीत.पंचनामे झाल्यानंतर जिल्ह्यात नेमके किती नुकसान झाले हे स्पष्ट होईल.

पावसाने दोन दिवस झोडपून काढल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्याला याचा मोठा फटका बसला. दै. 'पुढारी'ने या परिसरात पाहणी केली असता सुमारे 4 हजार 200 हेक्टरवरील भात पीक भुईसपाट झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. भात पिकांचे सुमारे 70 ते 80 कोटींचे नुकसान झाले आहे. हातकणंगले तालुक्यातही 15-20 हेक्टरवरील ज्वारीला फटका बसला आहे.

अवकाळीने बळीराजा बेजार!

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कृषी क्षेत्राला जवळपास साडेतीन हजार कोटींचा दणका बसला आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. साखर हंगामही लांबणीवर पडून ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे. पश्चिम भागातील खरिपालाही फटका बसला आहे. शेती आणि शेतकर्‍यांबरोबरच मजुरांच्या आयुष्यालाच या अवकाळीने अवकळा आणली आहे.

2 डिसेंबर रोजी जिल्ह्याच्या बहुतांश भागात तुफानी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास चौदा ते पंधरा तास सलगपणे हा पाऊस कोसळत होता. जिल्ह्यात ऊस आणि द्राक्षे या पिकांखालील क्षेत्र सर्वाधिक असल्यामुळे या दोन पिकांवर अवकाळीचा भयंकर परिणाम झाला आहे.

जिल्ह्यात 79 हजार 440 हेक्टर इतके द्राक्षाचे क्षेत्र आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम महिना-दीड महिना उशिरानेच सुरू झाला आहे. हंगामाच्या पहिल्या टप्प्यातच ऑक्टोबरमध्ये अवकाळीने दणका दिल्याने जवळपास 25 टक्के बागा वाया गेल्या होत्या. उरल्यासुरल्या बागांपैकी आणखी 30-35 टक्के बागा परवाच्या अवकाळी दणक्यात धारातिर्थी पडल्या आहेत.
जिल्ह्यात द्राक्ष हंगामाचे अर्थकारण जवळपास पाच हजार कोटी रुपयांचे आहे. त्यापैकी जवळपास तीन हजार कोटी रुपयांवर दोन-तीनवेळच्या अवकाळीने पाणी फिरविले आहे. उरल्यासुरल्याचाही काही भरोसा राहिलेला नाही.

जिल्ह्यात यंदा 1 लाख 22 हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. जवळपास एक कोटी टन इतका विक्रमी ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. या सगळ्या उसाचे गाळप करणे हे यंदा साखर कारखान्यांपुढे आव्हान आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमधील अवकाळीमुळे आधीच हंगाम लांबलेला आहे. तशातच परवा झालेल्या मुसळधार अवकाळीमुळे जिल्ह्यातील बहुतांश भागातील ऊसतोडी ठप्प झाल्या आहेत. उसाच्या फडांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे आणखी आठवडाभर तरी हंगाम नव्या जोमाने सुरू होऊ शकत नाही. परिणामी, साखर हंगाम लांबून त्याचा शेतकर्‍यांना किमान 500 कोटी रुपयांचा दणका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खरिपाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप ज्वारी भुईसपाट झाली आहे. पाण्यात बुडून गेल्याने हरभर्‍याचे पीक वाया गेल्यात जमा आहे. घाटमाथ्यावरील खरीप गव्हाचे आणि शिराळ्यातील खरीप भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील द्राक्षशेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या दोन-तीन वर्षांत 50 टक्के द्राक्ष बागा शेतकरी काढून टाकतील. अस्मानी संकटातून शेतकरी आणि द्राक्षशेती वाचवायची असेल, तर शासनाने अवकाळी पावसाने द्राक्ष बागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. तत्काळ नुकसानभरपाई द्यावी; अन्यथा भविष्यात द्राक्षशेती मातीमोल व्हायला वेळ लागणार नाही.

– जगन्नाथ मस्के,
माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 30 ते 40 टक्के द्राक्ष बागांना फटका बसल्याचा अंदाज आहे. सप्टेंबरमध्ये छाटणी झालेल्या बागांमध्ये मन्यामध्ये पाणी उतरण्याच्या अवस्थेत क्रॅकिंग दिसून येत आहे. ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा आंबिया बहार उतरविला आहे. त्या शेतकर्‍यांना नुकसानीचे ट्रिगर लागू झाले आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांना साधारणत: 40 हजार ते दोन लाख 34 हजार एवढी नुकसानभरपाई मिळू शकते.

– मनोज वेताळ, जिल्हा कृषी अधिकारी

सातार्‍यात दीड हजार कोटींचे नुकसान

सातारा : पुढारी वृत्तसेवा

अवकाळी संकटाने सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पुन्हा एकदा झोपवले असून, हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. केवळ शेतातच नव्हे, तर शेतकर्‍यांच्या डोळ्यांतही पाण्याचे थैमान सुरूच आहे. शेतीचे व पिकांचे झालेले अतोनात नुकसान शेतकर्‍यांच्या काळजावर डागण्या देऊन गेले आहे. पशुधनाचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. छोटा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. जिल्ह्यात सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले.

अवकाळी पावसानं बुधवार व गुरुवारी केलेला थयथयाट होत्याचं नव्हतं करून गेला. सातार्‍यासह वाई, खंडाळा, फलटण, जावळी, महाबळेश्वर, कराड, पाटण, कोरेगाव व दुष्काळी माण अन् खटावमध्येही पावसानं अतोनात नुकसान केलं. पिकांचे झालेले नुकसान, कोलमडलेले अर्थकारण, कर्जाची चिंता, संसाराचे बिघडलेले गणित, मुलाबाळांच्या भविष्याची काळजी, यामुळे शेतकरी जगण्याचं अवसानच गमवून बसला.

जिल्ह्यात माण-खटाव तालुक्यात सुमारे 250 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागा आहेत. त्यांचे पावसामुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. महाबळेश्वर व पाचगणी परिसरात सुमारे 1,700 ते 1,800 एकरांवर स्ट्रॉबेरी हे प्रमुख पीक घेतले जाते. या ठिकाणी प्रचंड पाऊस झाल्याने स्ट्रॉबेरी पीक काही ठिकाणी पाण्याखाली गेले आहे. 300-400 एकरांवरील स्ट्रॉबेरीचे क्षेत्र धोक्यात येण्याची भीती आहे.

दोनशे शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू

बुधवारी रात्रभर झालेल्या पावसाने जिल्ह्यात सुमारे 200 शेळ्या-मेंढ्यांचा तडफडून मृत्यू झाला. मेघलदरेवाडी (ता. खटाव), खटाव, व भिरडाचीवाडी (ता. वाई) या ठिकाणी सुमारे 85 शेळ्या व मेंढ्यांचा, तर कोरेगाव तालुक्यात मंगळापूर 22, चांदवडी 6, चंचली 2, कुमठे गाव परिसरात 20 तसेच गोळेवाडी येथे 23 अशा 200 शेळ्या-मेंढ्यांचा गारठून मृत्यू झाला.

8 लाखांच्या मदतीचे आदेश

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ज्वारी, हरभरा या पिकांसोबतच महाबळेश्वर परिसरातील सुमारे 300-400 एकर क्षेत्रातील स्ट्रॉबेरीला पावसाचा तडाखा बसला. द्राक्षासह इतर फळबागांचेही नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली. पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कृषी विभागाची आढावा बैठक घेऊन बाधित 345 अल्प व अत्यल्पभूधारक शेतकर्‍यांना प्राथमिक स्वरूपात सुमारे 8 लाखांची मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

कोकणचे अर्थकारण अवकाळीने बिघडले

रायगड/ सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा

नोव्हेंबर-डिसेंबर या आंबा, काजू पिकांच्या मोहोराच्या ऐन हंगामात आलेल्या अवकाळी पावसाने कोकणच्या बागायतींना मोठा फटका दिला असून, सुमारे अडीच हजार कोटींचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हापूसला जवळपास 600 कोटींचा तडाखा बसला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात काजू, आंबा पिकांचे 1,300 कोटींचे नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यात पांढरा कांदा व हापूसचे 350 कोटींचे, तर मच्छीमारांचे दोनशे कोटींचे नुकसान झाले आहे. पालघर-घोलवडच्या जगप्रसिद्ध चिकूलाही या पावसाचा तडाखा बसला आहे. 100 कोटींची उलाढाल असलेल्या चिकूलाही 50 टक्के नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील आंबा बागायतदारांचे हेक्टरी सरासरी अडीच लाख याप्रमाणे प्राथमिक अंदाजानुसार एकूण अडीच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथील प्रयोगशील आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे, पालघरच्या चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी दिली आहे. कोकणातील आंबा उत्पादन, मासळी आणि पर्यटन व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. समुद्र खवळला असून, गेल्या काही दिवसांपासून मत्स्य व्यवसायही पूर्णपणे ठप्प झाला आहे. तसेच जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायालाही अवकाळी पावसाने तडाखा दिला असून, कोकणचे अर्थकारणच बिघडले आहे.

अवकाळीमुळे जवळपास 2 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान कोकणातील 5 जिल्ह्यांत झाले आहे. यामध्ये हापूस आंब्याच्या प्रमुख पट्ट्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हापूसला 600 कोटींचा फटका बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हापूस, काजू आणि मच्छीमारीला 1,300 कोटींचा फटका बसल्याचे आंबा उत्पादक संघाचे डॉ. विवेक भिडे यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात आंबा आणि पांढर्‍या कांद्याचे 350 कोटींचे नुकसान झाले आहे. तर 100 कोटींची उलाढाल असलेल्या पालघरमधील चिकू बागायतींना 50 कोटींचा फटका बसला आहे.
अवकाळी पाऊस झाल्याने मोहोरपूर्व मशागतीवर केलेला खर्च आणि मोहोर आल्यावर कीटकनाशकांच्या फवारण्यांकरिता केलेला 100 टक्के खर्च वाया गेला आहे. त्यातच आता मोहोर गेल्याने, आंब्याची झाडे पुन्हा मोहोरून, परागीभवन होऊन, आंबा फळ धारणा यंदा होण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी अधिकचा लागणार आहे. मात्र, त्यामध्ये संपूर्ण अनिश्चितताच आहे.
– चंद्रकांत मोकल,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT