कोल्हापूर उत्तर : भाजप लढणार की बिनविरोध करणार? | पुढारी

कोल्हापूर उत्तर : भाजप लढणार की बिनविरोध करणार?

कोल्हापूर; सतीश सरीकर : काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे ( कोल्हापूर उत्तर ). या ठिकाणी आ. जाधव यांच्या पत्नी व भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री जाधव यांची विधानसभेवर बिनविरोध निवड करण्यासाठी भाजपने मन मोठे करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शोकसभेत केले. त्यानंतर भाजप लढणार की निवडणूक बिनविरोध करणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. जाधव कुटुंबीय मूळचे भाजपवासी असून, महापालिकेच्या मागील सभागृहात जयश्री जाधव व त्यांचे दीर संभाजी जाधव हे भाजपचेच नगरसेवक होते. परिणामी, भाजपही धर्मसंकटात सापडल्याची स्थिती आहे.

पंढरपुरात भाजपकडून राष्ट्रवादीचा पराभव ( कोल्हापूर उत्तर )

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली. तर भाजपने समाधान अवताडे यांना मैदानात उतरवले. या निवडणुकीत अवताडे यांनी बाजी मारली. अवताडे यांनी हा मतदारसंघ भाजपकडे खेचून घेतला. त्यामुळे कोल्हापूरबाबत भाजपश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

पालकमंत्री सतेज पाटील काय निर्णय घेणार? ( कोल्हापूर उत्तर )

मंत्री मुश्रीफ यांनी शोकसभेत जयश्री जाधव यांचे नाव जाहीर केले असले, तरी उमेदवारी कुणाला द्यायची? हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जयश्री जाधव यांच्यासोबतच माजी आ. मालोजीराजे, त्यांच्या पत्नी मधुरिमाराजे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर सागर चव्हाण यांच्या नावांचीही काँग्रेस उमेदवारीसाठी चर्चा सुरू झाली आहे. आ. जाधव यांच्या अंत्ययात्रेवेळी पालकमंत्री पाटील व मालोजीराजे एकत्रच होते. शहरात त्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. 2005 मधील सतेज पाटील व मालोजीराजे पुन्हा एकत्र येणार का? या चर्चेला उधाण आले आहे. परिणामी, जाधव यांना उमेदवारी मिळणार की दुसरा उमेदवार देणार, यावरही निवडणूक बिनविरोध होणार की रणधुमाळी माजणार? हे अवलंबून आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावरच कुणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय अवलंबून असणार आहे.

आ. जाधव यांची भाजपशीही घनिष्ठ मैत्री ( कोल्हापूर उत्तर )

आ. जाधव हे उत्कृष्ट फुटबॉलपटू होते. फुटबॉलच्या माध्यमातून त्यांचा कोल्हापुरातील प्रत्येक तालीम संस्थांशी निकटचा संपर्क होता. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वीपासून ते शहरातील फुटबॉल संघांना आर्थिक मदत करत होते. कालांतराने ते निवडणुकीत उतरले. भाजपकडे त्यांचा कल होता. त्यांच्या पत्नी जयश्री जाधव व बंधू संभाजी जाधव हे महापालिकेच्या मागील सभागृहात भाजपचे नगरसेवक होते. दिवंगत आ. जाधव हे 2014 मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपकडून लढण्यास इच्छुक होते. भाजपकडे त्यांनी उमेदवारीही मागितली होती. परंतु, भाजपने अमल महाडिक यांना मैदानात उतरवले होते.

चंद्रकांत जाधव 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून लढण्यास इच्छुक होते. परंतु, शिवसेना-भाजप युतीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. काँग्रेसने जाधव यांना उमेदवारी देऊन रणांगणात उतरवले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून जाधव काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. परंतु, तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती. त्यामुळे काँग्रेसने जयश्री जाधव यांना उमेदवारी दिल्यास भाजप काय करणार? हे पाहावे लागणार आहे.

खा. राजीव सातव यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून डॉ. सातव यांची निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. डॉ. सातव यांची बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीतील अंतर्गत रणनीतीनुसार एखाद्या सदस्याचे निधन झाल्यास त्या पक्षालाच ती जागा सोडण्यात येते. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आ. जाधव यांचे निधन झाल्याने ही जागा काँग्रेसकडे जाते. त्यानुसार महाविकास आघाडीच्या अंतर्गत समझोत्यानुसार शिवसेना ही जागा काँग्रेसला सोडणार? याकडे लक्ष असेल.

शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ( कोल्हापूर उत्तर )

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. गेली दोन वर्षे महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ. चंद्रकांत जाधव यांनी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. त्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद देऊन कोल्हापुरात शिवसेनेचे अस्तित्व टिकवले आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. राज्यात महाविकास आघाडी असली, तरी शिवसेना ही जागा लढवणार की काँग्रेसला सोडणार? तसेच आघाडी धर्म पाळणार का? हाही प्रश्न आहे. कारण, गेल्या विधानसभेत कोल्हापूर जिल्ह्यात सहा आमदार असलेल्या शिवसेनेचे आता फक्त प्रकाश आबिटकर हेच एकमेव आमदार आहेत. परिणामी, शिवसेनेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

Back to top button