परमबीर सिंग विरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल | पुढारी

परमबीर सिंग विरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची खंडणी गोळा केल्याचा आरोप करून वादाच्या भोवर्‍यात सापडलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन हिंदुराव वाझे, सुमीत सिंग ऊर्फ चिंटू, अल्पेश भगवानभाई पटेल यांच्याविरुद्ध गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटने शनिवारी किल्ला कोर्टात आरोपपत्र सादर केले. खंडणीच्या प्रकरणी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध सादर करण्यात आलेले हे पहिलेच आरोपपत्र असून, त्यांच्याविरुद्ध खंडणीच्या अन्य चार गुन्ह्यांची नोंद आहे. या चारही गुन्ह्यांत लवकरच त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र सादर होणार आहे.

परमबीर सिंग, सचिन वाझे, सुमीत सिंग व अल्पेश पटेल यांच्याविरुद्ध शनिवारी सादर करण्यात आलेले आरोपपत्र 1 हजार 895 पानांचे आहे. त्यात सात पोलीस अधिकार्‍यांसह 62 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या गुन्ह्यात रियाज भाटी, विनय सिंग यांच्यासह इतर काही जणांना पाहिजे आरोपी दाखवण्यात आले आहे.

गोरेगाव येथील व्यावसायिक विमल अग्रवाल यांनी 20 ऑगस्टला गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, सचिन वाझे, अल्पेश पटेल, रियाज भाटी व अन्य आरोपींनी खंडणीसाठी धमकी दिल्याची व खंडणी वसूल केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावरून सर्व आरोपींविरुद्ध खंडणी व भारतीय दंड विधानातील कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास नंतर कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण, विशाल पाटील तपास करत आहेत.

गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी सचिन वाझे, अल्पेश पटेल आणि सुमीत सिंग यांना अटक केली होती. त्यापैकी वाझे न्यायालयीन कोठडीत असून, पटेल आणि सिंग यांना स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याच गुन्ह्यात परमबीर सिंग यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स अनेकदा बजावण्यात आले, मात्र ते चौकशीसाठी हजर राहात नसल्याने वॉरंट जारी करून नंतर फरारी आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेे.

सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यावर परमबीर सिंग सहा महिन्यांनंतर चंदीगढ येथून मुंबईत आले आणि 25 नोव्हेंबरला कांदिवली युनिट येथे चौकशीसाठी हजर झालेे. त्यांची तब्बल सात तास कसून चौकशी केल्यानंतर सोडून देण्यात आलेे.

परमबीर सिंग आणि सचिन वाझे हे दोघेही खंडणीचे रॅकेट चालवत होते हेे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी काही पुरावे गोळा केले असून काही साक्षीदारांच्या जबाबातून ही बाब उघडकीस आली आहे, असे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले. या गुन्ह्यात विनय सिंग आणि रियाज भाटी यांच्यासह इतरांविरुद्ध लवकरच पुरवणी आरोपपत्र सादर केले जाणार आहे.

काय आहे आरोपपत्रात?

1 हजार 895 पानांचे आरोपपत्र; सात पोलीस अधिकार्‍यांसह 62 साक्षीदारांचे जबाब, काहींचे जबाब सीआरपीसी 164 अंतर्गत महानगर दंडाधिकार्‍यासमोर नोंदवण्यात आले.

परमबीर सिंग यांच्या आदेशावरून सचिन वाझे खंडणीवसुली करत असल्याची पोलिसांकडून पडताळणी व काही ठोस पुरावे हाती लागले.

परमबीर यांनी सचिन वाझेला दररोज दोन कोटी खंडणीवसुलीचे ‘टार्गेट’ दिल्याची एका पोलीस अधिकार्‍याची कबुली. हा पोलीस अधिकारीच मुख्य साक्षीदार आहे.

सचिन वाझेने आपल्याकडून सुमारे 12 लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याचा तक्रारदार विमल अग्रवाल यांचा आरोप. बोहो बार अ‍ॅण्ड रेस्टॉॅरंटमधून वसुलीचे काम; तेथेच ही रक्कम देण्यात आली.

गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतलेल्या 69 ध्वनिफिती तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत. वाझेने वारंवार उल्लेख केलेला ‘नंबर एक’ म्हणजे परमबीर सिंग असल्याचे उघड.

Back to top button