ओमायक्रॉन चे भय आणि वास्तव | पुढारी

ओमायक्रॉन चे भय आणि वास्तव

कोव्हिड विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे जगभरात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. ओमायक्रोनमध्ये डेल्टा व्हेरियंटपेक्षा 50 प्रकारची म्युटेशन झाली असून, त्यामधील 30 ते 32 ही ड प्रोटिनशी निगडित आहेत. त्यामुळे त्याची मानवी पेशीला संसर्गित करण्याची क्षमता दुपटीने वाढली आहे. हा विषाणू आफ्रिकन खंडातून बदलून आल्यामुळे जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे.

दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोव्हिडच्या भयछायेत असून भारतातील स्थिती आताशी काही प्रमाणात पूर्वपदावर येत असताना, दक्षिण आफ्रिकेतून पुन्हा निराशजनक बातमी समोर आली. जानेवारी 2020 पासून चीनमधून कोरोनाचा सुरू झालेला प्रवास मार्च 2020 अखेर संपूर्ण जगात झाला. सुरुवातीला सर्वसामान्य लोकांना आणि संशोधकांना कोरोना व्हायरस हा एकच काहीतरी विषाणू आहे, अशी समजूत होती. मात्र, या समजुतीला तडा गेला जेव्हा ब्रिटनमध्ये ऑक्टोबर 2020 मध्ये या विषाणूमधील झालेला बदल (म्युटेशन) दिसून आला. याच झालेल्या म्युटेशनमुळे ब्रिटनमध्ये डिसेंबर 2020 ते मार्च 2021 पर्यंत दुसरी लाट आली (अल्फा).

मार्च 2021 मध्ये भारतामध्ये कोरोनामधील दुसरा बदल दिसून आला (डेल्टा) आणि याचमुळे मार्च ते ऑगस्ट 2021च्या दरम्यान भारतात दुसरी लाट आली. नोव्हेंबर 2020 मध्ये ब्राझीलमध्ये जे विषाणूचे म्युटेशन सापडले (ग्यामा) त्यामुळे ब्राझीलमध्ये आलेली लाट अजूनही ओसरलेली नाही. दक्षिण आफ्रिकेतून मे 2020 मध्ये एक नवीन विषाणूचे म्युटेशन आले होते (बीटा); त्यामुळेसुद्धा जगात घबराट पसरली होती. मात्र त्यावर नियंत्रण मिळवता आले होते. मात्र, आता जे विषाणूचे म्युटेशन सापडले आहे, त्याचे मूळ दक्षिण आफ्रिका नसून बोत्सवाना या जवळच्या देशात त्याचा उगम असल्याचा काही लोकांचा दावा आहे.

मात्र, त्या देशात दक्षिण आफ्रिकेसारखी अद्ययावत यंत्रणा नसल्याने तिथे त्याचे जीनोम सिक्वेन्सिंग करता आले नाही. मात्र, नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांत दक्षिण आफ्रिकेतील गौटेन्ग भागात अचानक कोव्हिडचे रुग्ण वाढल्यावर मात्र तेथील स्थानिक प्रशासन जागे झाले आणि त्यानंतर त्यांना समजले की, या रुग्णवाढीमागे नवीनच विषाणूचे म्युटेशन (ओमायक्रॉन) आहे. लगेचच याची माहिती दक्षिण आफ्रिकन सरकारने जगासमोर जाहीर केली.

काय बदल झाला आहे?

ओमायक्रॉन म्युटेशन नक्की काय आहे, हे जाणून घेण्यापूर्वी विषाणूमध्ये याआधी काय बदल झाले होते ते जाणून घेऊया. मूळ कोरोना विषाणू जो चीनमध्ये सापडला होता, त्याच्यावर काही प्रथिने होती. त्या प्रथिनांमुळेच विषाणूला मानवी पेशीत जाण्याच्या मार्ग मिळतो. त्याला शास्त्रीय भाषेत स्पाईक प्रोटिन (ड प्रोटिन) म्हणतात. मूळ विषाणूवर जेवढे ड प्रोटिन होते, त्याच्यामध्ये 28 प्रकारचे बदल होऊन ब्रिटनमधील अल्फा व्हेरियंट तयार झाला होता. अल्फा व्हेरियंटपेक्षा डेल्टा व्हेरियंटमध्ये 40 टक्के बदल होऊन तो अतिशय वेगाने लोकांना संसर्गित करत होता.

आताच्या ओमायक्रॉनमध्ये डेल्टा व्हेरियंटपेक्षा 50 प्रकारची म्युटेशन झाली असून, त्यामधील 30 ते 32 ही ड प्रोटिनशी निगडित आहेत. त्यामुळे त्याची मानवी पेशीला संसर्गित करण्याची क्षमता दुपटीने वाढली आहे. त्याचबरोबर डेल्टा व्हेरियंटमुळे संसर्गित झालेला एक रुग्ण सध्या फक्त एकालाच संसर्ग करतोय, तर तेच प्रमाण ओमायक्रॉनसाठी दोन आहे आणि यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने फक्त 72 तासांमध्ये या व्हेरियंटला व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणजेच जगासाठी चिंतेचा प्रकार म्हणून जाहीर केले आहे, तर डेल्टा व्हेरियंटला व्हेरियंट ऑफ कन्सर्न जाहीर करण्यास एक महिन्याचा कालावधी गेला होता.

आफ्रिकेतील सध्याची स्थिती

सोमवार अखेरीपर्यंत दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉनच्या उद्रेकामुळे रुग्णालयात रुग्णांची वाढ झालेली दिसून आली नाही. परंतु यामागची वास्तविक स्थिती वेगळी असू शकते. सध्या जे रुग्ण आहेत ते प्राथमिक संसर्गित झालेले असून, त्यापैकी बर्‍याच रुग्णांचे कोव्हिडसद़ृश्य आजार अजूनही प्रगती करत आहेत आणि बहुतेक नवीन संक्रमण तरुणांमध्ये आढळले आहेत. या रुग्णांमध्ये तीव्र थकवा असलेल्या वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या आणि विविध वंशाच्या तरुणांचा समावेश आहे. एका सहा वर्षांच्या मुलामध्येही हा व्हेरियंट सापडला आहे. याचबरोबर वृद्ध तसेच प्रौढ किंवा कॅन्सर मधुमेह असे आजार असणार्‍या आणि अतिशय कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या लोकांवर हा ओमायक्रॉन कसा परिणाम करेल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

ओमायक्रॉनमुळे गंभीर आजार होतो की नाही, किंवा इतर प्रकारांपेक्षा कमी किंवा जास्त गंभीर आजार, हे आणखी एक किंवा दोन आठवडे स्पष्ट होणार नाही. प्राथमिक विश्लेषण असे सूचित करते. सध्या दक्षिण आफ्रिकेतील गौतेंग प्रांतातील 80% पेक्षा अधिक कोव्हिड रुग्ण हे ओमायक्रॉनचे असून हा संसर्ग वेगाने वाढत आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न हाही संशोधकांच्या विचारधीन आहे की, ओमायक्रॉन हा डेल्टाची जागा घेऊ शकतो का किंवा ओमायक्रॉनमुळे डेल्टाचे रुग्ण कमी होतील का? आफ्रिकेतील काही प्रांतांतून आलेल्या माहितीनुसार काही ठिकाणी अतिशय वेगाने ओमायक्रॉनने डेल्टाला मागे टाकले आहे किंवा त्याची जागा घेतली आहे.

आता लसीकरणात असलेल्या लसी ओमायक्रॉनवरती चालतील का?

हा सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रश्न आहे. जगभरात आजच्या दिवशी कमीत कमी 6 लसी कोव्हिड लसीकरणासाठी उपयोगात असून, त्यामध्ये फायजर कंपनीची लस सर्वात जास्त म्हणजे 250 कोटी आणि त्याखालोखाल ऑक्सफर्ड- अस्त्राझेनेका (कोव्हिशिल्ड) ही जवळपास 200 कोटी लोकांना दिली आहे.

प्रथमदर्शनी जी माहिती समोर येते आहे, त्यामध्ये युरोपमधील फायजरची लस घेतलेल्या लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला दिसून आला आहे; तर आफ्रिकेतच ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेका घेतलेल्या लोकांना याचा संसर्ग झालेला दिसून आला आहे. शास्त्रज्ञ सध्या विषाणूमधील होणार्‍या उत्परिवर्तनांच्या संख्येने चिंतेत आहेत आणि त्यापैकी काही आधीच नैसर्गिक किंवा लसीमुळे तयार झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीचे संरक्षण टाळण्याच्या क्षमतेशी जोडलेले आहेत. हे सैद्धांतिक म्हणजे गणितीय अंदाज आहेत.

याचबरोबर रुग्णांच्या शरीरात तयार झालेली अल्फा, बीटा, ग्यामा आणि डेल्टा व्हेरियंट विरुद्धची प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) ओमायक्रॉनविरुद्ध किती प्रभावीपणे कार्य करतात, याची चाचणी घेण्यासाठी वेगाने अभ्यास केले जात आहेत. आधी ज्या लोकांना अल्फा, बीटा, ग्यामा आणि डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झाला होता त्यांना पुन्हा ओमायक्रॉनचा संसर्ग होईल का हेसुद्धा याक्षणी निश्चितपणे सांगता येत नाही. पण बदललेल्या ओमायक्रॉनच्या सुरुवातीच्या गुणधर्मावरून री-इन्फेक्शनची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी वास्तविक-जागतिक डेटा लवकरात लवकर समोर आला पाहिजे.

अनेक लस उत्पादकांनी ओमायक्रॉन लसीमुळे किती चांगले संरक्षण होते यावर अभ्यास सुरू केला आहे. ऑक्सफर्ड – अस्त्राझेनेका दक्षिण आफ्रिकेच्या सीमेवर बोत्सवाना आणि इस्वाटिनीमधील लोकांमध्ये संक्रमण आणि लसीकरण स्थितीचे विश्लेषण करत आहे. दरम्यान, फायझरच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीला येत्या आठवड्यात त्याच्या स्वतःच्या अँटिबॉडी अभ्यासातून प्रारंभिक परिणाम मिळण्याची आशा आहे. जर ओमायक्रॉन व्हेरियंट मोठ्या प्रमाणात लसीची सुरक्षितता भेदून गंभीर आजार करत असेल तर फायजर आणि मॉडर्न कंपनीने दावा केला आहे की, ते नियामकांच्या मान्यतेच्या अधीन राहून, सुमारे 100 दिवसांत नवीन, टेलर-मेड लस तयार करू शकतात.

ओमायक्रॉन खरेच चिंतेचा विषय आहे का?

सध्या तरी लोकांनी लगेचच घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र हा विषाणू आफ्रिकन खंडातून बदलून आल्यामुळे जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे. यापूर्वी आफ्रिकेत सापडलेल्या इतर (इबोला किंवा मारबुर्ग) विषाणूमुळे रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक होते. यामागची कारणे वेगळी होती, मात्र तसेच प्रकार कोरोना विषाणूबद्दल होईल हे सांगता येत नाही.

ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी साधारणपणे डबल मास्क (आतमध्ये सर्जिकल मास्क व बाहेरून कापडी मास्क) वापरणे, गर्दीच्या ठिकाणी, इतरांसोबत असताना/बंदिस्त जागेमध्ये मास्क न काढणे, याचबरोबर युद्धपातळीवर लसीकरण वेगाने करून लोकांना लसीचे दोन डोस घेऊन लसीकरण पूर्ण करणे, हासुद्धा उपाय योग्य ठरू शकतो.

साधारणपणे जर लसीकरण सहा ते नऊ महिन्यांपूर्वी झाले असेल, तर संसर्ग टाळण्यासाठी खास काळजी घ्यावी लागेल. यामध्ये घरातील वयोवृद्ध तसेच सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. लहान मुलेे आणि तरुणांमध्ये लक्षणविहीन संसर्ग किंवा सर्दीसारखी लक्षणे असण्याची अधिक शक्यता असते, त्यामुळे संसर्ग पुढे जाऊ नये म्हणून लक्षणे नसतानादेखील काळजी घेणे आवश्यक आहे.
(लेखक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड येथील मेडिकल सायन्स डिव्हिजनमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

डॉ. नानासाहेब थोरात

Back to top button