पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध पाकिस्तान, इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ॲशेस मालिका यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या पसंतीचा सामना कुठला असेल तो म्हणजे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी, वनडे, टी-२० या सामन्यातील लढती नेहमीच रोमांचकारी असतात. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी सामन्यांची मालिकाही अशी क्रिकेट चाहत्यांच्या पसंतीची आहे. (Harbhajan singh monkeygate)
ऑस्ट्रेलियन संघ नेहमीच आक्रमक खेळासाठी क्रिकेट विश्वात ओळखला जातो. तसेच मैदानावर प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू स्लेजिंग करत राहतात. नव्या दमाचा भारतीय संघही ऑस्ट्रेलियाच्या स्लेजिंगला जशाच तसे उत्तर देण्यात माहिर झाल्याचे सध्या पहायला मिळते. आता आरे ला.. कारे केल्यावर वाद हा उद्भवणारच. त्यामुळे अनेकदा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये वाद झाले आहेत. अशा एका वादाने क्रिकेट जगताला हादरवून सोडले होते. ते प्रकरण म्हणजे २००८ मध्ये भारताचा हरभजन सिंग आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅन्ड्रय़ू सायमंड्स यांच्यात घडलेले 'मंकीगेट' प्रकरण.
२००७-०८ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. मेलबर्न कसोटी सामन्यात यजमान संघाने भारताचा ३३७ धावांनी दारुण पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० आघाडी घेतली. दुसरा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर होता. या सामन्यात पहिला फलंदाजी करताचा ऑस्ट्रेलियन संघ ६ विकेट गमावून १९३ धावांवर संघर्ष करत होता. इशांत शर्माचा एक चेंडू अँड्र्यू सायमंड्सच्या बॅटला लागला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सर्वांनी हे पाहिले आणि ऐकले पण पंच स्टीव्ह बकनर यांच्या कानापर्यंत हा आवाज पोहोचला नाही. त्यांनी सायमंडच्या बाजूने कौल देत नाबाद घोषित केले. (त्यावेळी रिव्ह्यू घेण्याची सोय नव्हती)
यानंतर तो हरभजन सिंगच्या चेंडूवर स्टंप आऊट झाला, पण तरीही स्टीव्ह बकनरने तो बाद नसल्याचे म्हटले. त्यांनी तिसऱ्या पंचाचीही मदत घेतली नाही. त्यानंतर अनिल कुंबळेच्या चेंडूवर स्टंप आऊटचे अपील झाले. तिसरे पंच ब्रूस ऑक्सनफोर्ड यांनी त्याला नाबाद घोषित केले. त्याचे पाय हवेत असल्याचे रिप्लेमध्ये दिसत असताना आणि समालोचकही सायमंड्स बाहेर असल्याचे सांगत होते. पण तरीही तो बाद नसल्याचा पंचांनी निर्णय दिला. पंचांकडून मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत सायमंड्सने १६३ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियन संघाने ४६३ धावा केल्या. यापूर्वी, सौरव गांगुलीच्या चेंडूवर रिकी पाँटिंगलाही पंचांनी नॉट आऊट घोषित केले होते.
भारतानेही ५३२ धावा करत चोख उत्तर दिले. व्हीव्हीएस लक्ष्मणने १०९ आणि सचिन तेंडुलकरने नाबाद १५४ धावांची खेळी केली. यानंतर ऑस्ट्रेलियाने ७ बाद ४०१ धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. भारताला विजयासाठी ३३३ धावांचे लक्ष्य मिळाले होते. शेवटच्या दिवशी फलंदाजी करतानाही टीम इंडियाने चुरश दाखवली. ३८ धावांवर खेळत असलेल्या राहुल द्रविडला अँड्र्यू सायमंड्सने विकेटच्या मागे झेलबाद केले. पण राहुल बाद असल्याचा निर्णय शंकास्पद होता. कारण त्याचे पॅड पुढे होते, अशातच चेंडू बॅटला स्पर्श न करता विकेटच्या मागे गेला. झेल पकडताच विकेटकीपर अॅडम गिलख्रिस्टने जोरदार अपील केले आणि पंचांनी द्रविडला बाद घोषित केले.
यानंतर ५१ धावांवर खेळणारा सौरव गांगुलीलाही खराब पंचगिरीचा फटका बसला. ब्रेट लीच्या एका चेंडूवर गांगुलीच्या बॅटची कड घेत चेंडू स्लिपमध्ये जातो. त्याठिकाणी फिल्डींगला उभारलेला मायकेल क्लार्क झेल पकडल्याचा दावा करतो. अगदी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगही बोट वर करून क्लीन कॅच पकडल्याचा दावा करतो. मैदानी पंचांना झेल पकण्याबाबत शंका येते. ते तिस-या पंचांची मदत घेतात. रिप्लेमध्ये क्लार्कने झेल नीट पकडलेला नसल्याचे दिसते. चेंडू जमिनीवर आदळून क्लार्कच्या हातात गेल्याचे दिसते. पण पंच मार्क बेन्सन गांगुलीला बाद घोषित करतात.
इतके चुकीचे निर्णय घेतल्यानंतरही भारतीय संघ सामना वाचवत असल्याचे दिसत होते, पण अखेर मायकेल क्लार्कने एका षटकात ३ बळी घेत सामन्याला कलाटणी दिली. अखेर भारतीय संघाचा १२२ धावांनी पराभव झाला. मैदानातील खराब पंचगिरी व्यतिरिक्त आणखी एक वाद होता जो खूप चर्चेत होता. यादरम्यान एक वाद झाला जो क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा वाद आहे.
सिडनी कसोटीचा तिसरा दिवस होता. हरभजन सिंग फलंदाजी करत होता. त्यादरम्यान भज्जीचा अँड्र्यू सायमंड्ससोबत वाद झाला. सामन्यात काटेकी टक्कर सुरू होती. सामना वाचवण्यासाठी सचिन तेंडुलकर आणि हरभजन मेहनत घेत होते. मात्र सायमंड्स भज्जीला मोठा फटका खेळण्यासाठी सतत चिथावणी देत होता. भज्जी एकाग्र होऊन क्रीजवर खेळत होता. तर त्याला सायमंड्स स्लेजिंग करून चिडवण्याचा प्रयत्न करत होता. भज्जीने संयम राखत काही वेळ त्याचे बोलणे ऐकले. मात्र काही वेळाने भज्जीच्या सहशिलतेचा बांध फुटला आणि त्याने सायमंड्सला प्रत्युत्तर दिले.
हरभजनने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर सामन्यातील वातावरण चांगलेच तापले. ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगने या सामन्याचे रणांगणात रूपांतर केले. त्याने थेट मॅच रेफरींकडे तक्रार केली. त्याची तक्रार साधीसुधी नव्हती. पाँटिंगने रेफ्रींकडे स्लेजिंगची तक्रार न करता हरभजनने वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा गंभीर आरोप त्याने केला. पाँटींग म्हणाला की, भज्जीने सायमंड्सला मैदानावर 'माकड' असे संबोधून त्याची खिल्ली उडवली.
आयसीसीच्या नियमांनुसार हा गुन्हा खूप मोठा होता. कोणत्याही प्रकारची वांशिक टिप्पणी हा 'लेव्हल थ्री' गुन्हा मानला जातो. यामध्ये आरोप सिद्ध झाल्यास कोणत्याही खेळाडूवर दोन ते चार कसोटी किंवा चार ते आठ एकदिवसीय सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आणि सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सामनाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू झाली. सुमारे सहा तास चाललेली सुनावणी मध्यरात्रीपर्यंत चालली आणि अखेर हरभजनला दोषी ठरवून तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली.
पण खरी कहाणी यानंतर सुरू होते. अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखालील संघाने हरभजन सिंगसोबत राहण्याचा निर्णय घेतला. यात त्यावेळचे दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, कुंबळे आणि लक्ष्मण हे आघाडीवर होते. भारतीय संघाने पुढील सराव सामन्यासाठी कॅनबेराला जाण्यास नकार दिला. भज्जीवरील वर्णद्वेषी वक्तव्याचे आरोप मागे न घेतल्यास दौरा रद्द करून परतणार असल्याचे टीम इंडियाने स्पष्ट केले. दुसरीकडे भारतातही त्या घटनेचे पडसाद उमटायला लागेले. खराब पंचगिरीवर प्रश्न उपस्थित करत भारतीय क्रिकेट चाहत्यांनी ऑस्ट्रेलिया संघाचा निषेध नोंदवला.
अशा परिस्थितीत आता बीसीसीआयही या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आले होते. ज्येष्ठ खेळाडूंनी दिलेल्या माहितीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खंबीर भूमिका घेतली आणि प्रकरणाचा निषेध केला. त्यानंतर या प्रकरणाला एवढा वेग आला की टीम इंडियाला परत आणण्यासाठी चार्टर्ड विमानाचीही व्यवस्था करण्यात आली. अखेर आयसीसीने भज्जीवरील बंदीचा निर्णय रद्द करीत अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल मानधनातील ५० टक्के रक्कम कापली.
यानंतर सामना जसा होता तसा पूर्ण झाला आणि ऑस्ट्रेलियाने काही वादग्रस्त निर्णयांच्या जोरावर सामना जिंकला. सामना संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने खिलाडूवृत्ती दाखवली नाही. टीम इंडियाचा कर्णधार अनिल कुंबळेसोबत शेकहँड न करता त्यांचे खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले. तर सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाँटींग पत्रकारावर भडकला होता. दुसरीकडे अनिल कुंबळेनं संयमीपणे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्याच्या एका वाक्याने तर पत्रकार परिषदेतील वातावरणच बदलून टाकले, तो म्हणाला होता की, 'सिडनी कसोटी सामन्यात फक्त एकाच संघाने खिलाडूवृत्तीने खेळ केला. ती तो संघ भारत होता…'