गिरीश महाजन,www.pudhari.news 
Latest

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात धुळे जिल्ह्याचे मोठे योगदान : गिरीश महाजन

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा

देशात सर्वत्र अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्वच स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिवीरांच्या योगदानाचे स्मरण करणारे हे वर्ष आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या या लढ्यात धुळे जिल्हाही मागे नव्हता. या योगदानाची आठवण शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावाजवळील क्रांतिस्मारक नेहमीच आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देते. असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिन सोहळ्याचा मुख्य समारंभ पोलिस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानिमित्त विविध क्षेत्रातील गुणवंतांना पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार मंजुळा गावीत, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, महानगरपालिका आयुक्त देवीदास टेकाळे, उपमहापौर नागसेन बोरसे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सत्यम गांधी, उप वनसंरक्षक नितिनकुमार सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विवेक नवले यांच्यासह लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रारंभी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी वाचन केले. तसेच पोलिस दलाच्या तुकड्यांनी मानवंदना दिली. पालकमंत्री महाजन यांनी पोलिस दलाच्या तुकड्यांच्या कवायतीचे निरीक्षण केले. संचलनाचे नेतृत्व सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांनी केले. या संचलनात पोलीस दल महिला, पुरुष, राज्य राखीव पोलीस दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, होमगार्ड, श्वान पथक, अग्निशमन पथक, शीघ्र कृती दल, रुगणवाहिका, पोलीस दलाचे बॅण्डपथक, विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. याशिवाय 'नॅब' संचलित स्वयंसेवी संस्थेचे दिव्यांग मुलांनी समूह नृत्य, कनोसा विद्यालय, जयहिंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले, तर जे. आर. सिटी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबची प्रात्यक्षिके दाखविली.

स्वातंत्र्याच्या या लढ्यात धुळे जिल्हाही मागे नव्हता…

पालकमंत्री महाजन म्हणाले, की सन 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. त्यासाठी स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारकांनी लढा दिला. त्यात अनेकांना शहीद व्हावे लागले. भारतीय स्वातंत्र्याच्या या लढ्यात धुळे जिल्हाही मागे नव्हता. या जिल्ह्याने स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान दिले आहे. या योगदानाची आठवण शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावाजवळील क्रांतिस्मारक नेहमीच आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देते. स्वातंत्र्याच्या वेळी देशात विविध जाती, भाषा, चालिरीती, परंपरा अस्तित्वात होत्या. या सर्वांना एका समान धाग्याने गुंफणे आवश्यक होते. या सर्वांना आजच्याच दिवशी सन 1950 मध्ये अंमलात आलेल्या भारतीय राज्य घटनेने एकसंध केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली आणि न्याय, समता, स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मूल्यांची देणगी देणारी आपली भारतीय राज्य घटना आजच्याच दिवशी अमलात आली. आपली ही राज्य घटना जगातील अनेक देशांना प्रेरणादायी ठरली आहे.

राज्य घटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार देश आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यामागे आपल्या राज्य घटनेत नमूद विविध तत्व कारणीभूत आहेत. अशा या राज्य घटनेच्या अंमलबजावणीत आपलाही सहभाग आहे. आपणही या राज्य घटनेचे पाईक आहोत. भारतीय राज्यघटना जगातील एक आदर्श राज्यघटना ठरलेली आहे. त्यामागे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेले परिश्रम आहेत. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगभरातील राज्यघटनांचा अभ्यास केला. त्यांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि सामाजिक समतेचे प्रणेते राजर्षि शाहू महाराज यांचे विचार मार्गदर्शक ठरले, असेही पालकमंत्री महाजन यांनी सांगितले.

यंदाचा प्रजासत्ताक दिवस हा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आलेला आहे. देशात सर्वत्र अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्वच स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिवीरांच्या योगदानाचे स्मरण करणारे हे वर्ष आहे. स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिवीरांनी दिलेल्या समता, बंधूभावाच्या संदेशाचे आपण सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. सामाजिक सलोखा, बंधूभाव, सौहार्दपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी एकसंघ भावनेने आजच्या दिवशी निश्चय केला पाहिजे, असेही आवाहन पालकमंत्री महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जगदिश देवपूरकर आणि वाहिद अली सैय्यद यांनी केले.

गुणवंतांचा गौरव

यावेळी पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. त्यात जिल्हाधिकारी जलज शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार, सैन्य दलातील दिव्यांग हवालदार जनार्दन राजाराम सोनवणे यांना ताम्रपटाचे वितरण, राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक सदाशिव पाटील यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस पदक देवून गौरविण्यात आले. पोलिस प्रशिक्षण केंद्रातील निरीक्षक रामकृष्ण नारायण पवार, गृहरक्षक दलातील सार्जंट मोनिका अशोक शिंपी, एकत्रित महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे, श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, धुळे, माझी वसुंधरा अभियानासह विविध उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल धुळे महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त तथा नोडल अधिकारी विजय रघुनाथ सनेर, अभियंता कैलास नरहर शिंदे, विभागप्रमुख राजेंद्र वामनराव माईनकर, विद्युत अभियंता नरेंद्र काशिनाथ बागूल, मुख्य स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत नथू जाधव, वृक्ष अधिकारी रविकिरण पाटकरी, शहर समन्वयक जुनेद अन्सारी, म्युकर मायकोसिसचे नोडल अधिकारी डॉ. नितीन पाटील, कार्यक्रम सहाय्यक महेंद्र नेरकर, हंगामी स्थलांतरीत विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्यांना त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याबद्दल जिल्हा परिषदेचे शिक्षक किशोर पंढरीनाथ पाटील (चिंचवार, ता. धुळे), अरुणा रामसिंग पवार (अंचाडे तांडा, ता. धुळे), प्रकाश रतन बागूल (नूरनगर, ता. धुळे), संजय श्रीराम पाटील (मल्हारपाडा, ता. धुळे), लोटन महादू माळी (नाणे, ता. धुळे), सतीश पांडुरंग पाटील (ढोलीपाडा), नगीनलाल बाबूलाल निकम (सातरपाडा), प्रकाश छगन बच्छाव (उभरांडी), प्रवीण वसंतराव बच्छाव (नवा प्लॉट), विलास गोविंदा गोयकर (वाघापूर, सर्व साक्री तालुका), रवींद्र भटू बोरसे (भडणे), अनिता बाबूराव राठोड (डांगुर्णे), हिंमतराव पोपट माळी (मुडावद), अतुल नाथसाहेब गलांडे (रेवाडी), दीपक रघुनाथ निकम (जोगशेलू, सर्व शिंदखेडा तालुका), राजू वामन मिस्तरी (सुळे), ज्ञानेश्वर दत्तात्रय पाटील (साकवद), दिलीप नामदेव पाटील (विखरण), अनिल बाबूराव बाविस्कर (भोईटी), डॉ. नीता मुरलीधर सोनवणे (सांगवी, सर्व शिरपूर तालुका).

आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. प्रियांका मधुकर सोनवणे, डॉ. मनीषा गोविंद चौधरी, डॉ. सायमा तजिन शेख खालेद, डॉ. हिमांशू गंगाराम सोनवणे, डॉ. नितीन अशोक पाटील (सर्व जिल्हा रुग्णालय, धुळे), डॉ. अर्जुन नामदेव नरोटे, डॉ. ललितकुमार भारत चंद्रे (उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचे), डॉ. हर्षवर्धन प्रभाकर चित्तम (ग्रामीण रुग्णालय, जैताणे), अधिपरिचारिका विजया प्रल्हाद शिरसाट (ग्रामीण रुग्णालय, शिंदखेडा), वर्षा विक्रम शिरसाट, स्वाती संजय बोरसे (अधिपरिचारिका, दोंडाईचे), बेबी नरसी गावित (साक्री), रुपाली अशोक उगले (साक्री), भावना गोरख सोनवणे, संगीता किशोर चव्हाण (धुळे), वर्षा रघुनाथ पगारे (पिंपळनेर), उज्वला दादाजी मोरे (परिसेविका, दोंडाईचा), कक्षसेवक विलास वंजी सोलंकी (दोंडाईचे), विनोद देवीदास निकम (शिरपूर), बाळकृष्ण अंकुश हटकर (धुळे), पोलिस पाटील ओम नामदेव तावडे (विरदेल), अप्पा जगन ढिवरे (रेवाडी), नम्रता राजेंद्रसिंग गौर (चिलाणे, सर्व ता. शिंदखेडा), नीता संदीप पाटील (फागणे, ता. जि. धुळे) यांचाही सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली. यावेळी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, सहायक जिल्हाधिकारी सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील, (सामान्य प्रशासन) सुरेखा चव्हाण (भूसंपादन), डॉ. अरविंद अंतुर्लीकर (निवडणूक), गोविंद दाणेज (रोहयो), महेश जमदाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, तहसीलदार गायत्री सैंदाणे यांच्यासह विविध विभागाचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सर्व उपस्थितांना तंबाखुमुक्तीची शपथ दिली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT