गोवा

सुदिन ढवळीकर यांना २४ जातिसंस्थांचा विरोध, मंत्रिपद न देण्याची मागणी

अनुराधा कोरवी

पणजी ः पुढारी वृत्तसेवा :  सरकार स्थापनेसाठी भाजपने मगोपचा पाठिंबा घेण्याआधी भाजपच्या अनेक आमदारांनी सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यास विरोध केला होता. आता गोमंतक बहुजन महासंघानेही विरोध केला आहे. महासंघाचे अध्यक्ष अनिल होबळे यांनी तसे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना काल शुक्रवारी (दि.25) सादर केले. या महासंघात राज्यातील 24 जातिसंस्थांचा समावेश आहे.

सुदिन यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याचा त्याचा फटका भाजप आणि राज्यातील बहुजन समाजाला बसल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. महासंघात 24 समाजांचा समावेश आहे. त्यात इतर मागासवर्गीय गटातील 19, तीन आदिवासी समाजांचा आणि दोन अनुसूचित जातींचा समावेश आहे. या सार्‍या समाजांचा सुदिन यांच्या मंत्रिमंडळातील समावेशास विरोध आहे. सुदिन यांचा सरकारमध्ये समावेश होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नही करणार आहोत, असे त्यांनी पत्राद्वारे सूचित केले आहे. या पत्राची प्रत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही होबळे यांनी पाठवली आहे.

भाजपला विधानसभा निवडणुकीत 20 जागा मिळाल्यानंतर आणि तीन अपक्षांनी विनाअट पाठिंबा दिल्यानंतर मगोपच्या दोन आमदारांची सरकार स्थापनेसाठी गरज नाही, असे भाजपच्या अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मगोपला सोबत घेण्याचा निर्णय भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी घेतला आहे. मगोपनेही भाजपला सरकार स्थापनेसाठी लेखी पाठिंबा दिला आहे. तसे पत्रही सुदिन यांनी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना सादर केले आहे. त्यामुळे सुदिन यांना मंत्रिमंडळात घेणार असे वाटून हा विरोध सुरू झाला आहे.

दरम्यान होबळे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे सरकार स्थापनेबद्दल पुष्पगुच्छ देऊन महासंघातर्फे अभिनंदन केले होते. त्याच्या दुसर्‍याच दिवशी होबळे यांनी हे पत्र लिहिले आहे.

एक शक्यता

भाजपच्या आमदारांनी मगोपच्या पाठिंब्याबाबतचा निर्णय हा पक्षाचा निर्णय असे सांगून, आपली भूमिका थोडी मवाळ केली असली तरी सुदिन यांच्यामुळे भाजपमध्येच नाराज गट तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT