‘कोल्हापूर उत्तर’ पोटनिवडणूक : जाधव, कदम यांच्यासह 17 उमेदवारी अर्ज वैध | पुढारी

‘कोल्हापूर उत्तर’ पोटनिवडणूक : जाधव, कदम यांच्यासह 17 उमेदवारी अर्ज वैध

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत तीन उमेदवारांचे चार अर्ज अवैध ठरले. शुक्रवारी झालेल्या छाननीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव व भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यासह 17 जणांचे अर्ज वैध ठरले. सोमवारी (दि. 28) दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे.

भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या अर्जावर काँग्रेसच्या वतीने संजय शेटे यांनी हरकत घेतली. कदम यांचे प्रतिज्ञापत्र विहित नमुन्यात नाही, त्यावरील नोटरीचा शिक्का तिरका आहे तसेच प्रत्येक पानावर स्वाक्षरी नाही, असा आक्षेप घेतला. त्यावर दोन्ही बाजूंचे लेखी म्हणणे घेण्यात आले. सुमारे पाच तासांनंतर तांत्रिक कारणाने अर्ज फेटाळता येत नसल्याचे स्पष्ट करत निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी हा आक्षेप फेटाळून लावला. सचिन प्रल्हाद चव्हाण यांचे दोन, सीमा शशिकांत कदम यांचा एक अर्ज ‘डमी’ असल्याने, तर मतदारसंघातील सूचक नसल्याने यशवंत कृष्णा शेळके यांचा दोनपैकी एक अर्ज अवैध ठरवण्यात आला.

Back to top button