गोवा

गोवा : जनसागराचा जल्लोष; 45 लाख पर्यटकांच्या साक्षीने नववर्षाचे स्वागत

मोहन कारंडे

पणजी/म्हापसा/पेडणे/मडगाव : मोठ्या वाद्यमेळाच्या ठेका धरायला लावणार्‍या संगीताच्या तालावर थिरकत नव्या वर्षाचे राज्यभर जल्लोषात स्वागत करण्यात आले. सुमारे 45 लाखांवर देशी-परदेशी पर्यटक नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आले आहेत. बहुतांशी पर्यटकांनी समुद्रकिनारी सैराट होऊन रात्र झिंगण्यात घालवली. पर्यटकांच्या तुफान गर्दीने किनारपट्टीला जत्रेचे रूप आले होते. सूर्यास्ताच्या साक्षीने सुरू झालेली पार्टी सूर्योदय झाला तरी सुरूच होती. कोरोनाच्या दोन वर्षांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर यावर्षी पर्यटकांना जल्लोष करण्याची संधी मिळाली आहे.

जागतिक पर्यटन नगरी असलेला गोवा निसर्गाच्या नजार्‍याने संपन्न आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देशी-परदेशी पर्यटकांची पावले गोव्याकडेच वळतात. जिवाचा गोवा करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून अनेक पर्यटकांनी गोव्यात मुक्काम केलेला आहे.

उत्तर गोवा जिल्ह्यातील मिरामार, दोनापावल (ता. तिसवाडी) कळंगुट, बागा, वागातोर, हणजूण, कांदोळी (ता. बार्देश) आश्वे, मांद्रे, मोरजी, हरमल (ता. पेडणे) या समुद्रकिनारी पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे अवतरले आहेत. दक्षिण गोवा जिल्ह्यातील पाळोळे, आगोंद, कोलवा, बाणावली, बागमाळो, माजोर्डा, बेतूल, बेताळभाटी, काणकोण, गालजीबाग आदी समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT