opposition of milk producers to 'cancellation of lease' of land
फोंडा : गोवा डेअरीच्या आमसभेत उपस्थित दूध उत्पादक आणि संचालक मंडळ.  Pudhari File Photo
गोवा

जमिनीच्या ‘लीज रद्द’ला दूध उत्पादकांचा तीव्र विरोध

पुढारी वृत्तसेवा

फोंडा; पुढारी वृत्तसेवा : गोवा डेअरीला दिलेली जमीन पुन्हा ताब्यात घेण्यास सरकारच्या पशुसंवर्धन खात्याने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने दूध उत्पादकांत खळबळ माजली आहे. गोवा डेअरीचे अस्तित्व टिकवण्यासाठी ही जमीन सरकारच्या ताब्यात देऊ नये, अशी एकमुखी जोरदार मागणी दूध उत्पादकांनी आज (रविवारी) झालेल्या गोवा डेअरीच्या विशेष सर्वसाधारण सभेत केली.

दूध उत्पादकांनी त्याला तीव्र विरोध

या सभेला गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर तसेच डॉ. रामा परब व संदीप परब पार्सेकर यांच्यासमवेत इतर अधिकारी उपस्थित होते. 65 दूध उत्पादक संस्थांच्या अध्यक्षांनी या सभेला उपस्थिती लावली आणि आपला जोरदार आक्षेप नोंदवला. गोवा सरकारच्या पशुसंवर्धन खात्याने गोवा डेअरीला कुर्टी व म्हारवासडा येथील एकूण 81 हजार 485 चौरस मीटर जमीन नव्वद वर्षांच्या करारावर केवळ 1रुपया वार्षिक नाममात्र भाडेपट्टीवर दिली होती. मात्र, आता म्हारवासडा-उसगाव येथील गोवा डेअरीचा पशुखाद्य प्रकल्प बंद असून हा प्रकल्प नुकसानीत असल्याने पशुसंवर्धन खात्याने ही जमीन परत मागितली आहे. मात्र, करार करताना म्हारवासडा-उसगाव व कुर्टी-फोंड्यातील जमिनी एकत्र असल्याने दोन्ही ठिकाणच्या जागांवर पशुसंवर्धन खाते ताबा घेऊ शकते, म्हणून दूध उत्पादकांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे.

गोवा डेअरीला उतरती कळा

सरकारने गोवा डेअरीला ही जमीन देताना राज्यातील दूध उत्पादकांच्या शिखर संस्थेला चांगले दिवस यावेत आणि दूध उत्पादकांची रोजीरोटी चालावी हा उदात्त हेतू मनात बाळगला होता, त्यामुळेच नंतरच्या काळात गोवा डेअरीची भरभराट झाली. मात्र नंतरच्या काळात गोवा डेअरीला उतरती कळा लागली मात्र गोवा डेअरीचा कुर्टी येथील दूध उत्पादक प्रकल्प नफ्यात असल्याने दूध उत्पादकांनी ही जमीन सोडू नये, गेल्या आमसभेत ठरल्याप्रमाणे निर्णय घेतला आहे, त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. पशूखाद्य प्रकल्पाच्या संचालकांनी पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिशीत गेल्या 2022 मध्ये पाठवलेल्या एका अहवालात गोवा डेअरी तोट्यात असल्याचे दाखवण्यात आले होते. त्याचाच हवाला घेत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र आता गोवा डेअरी नफ्यात येत असून त्याचा फायदा दूध उत्पादकांना होत आहे, त्यामुळे गोवा डेअरीची भाडेपट्टीवरील जमीन पुन्हा सरकारच्या ताब्यात देऊ नये असे दूध उत्पादकांचे म्हणणे आहे. गोवा डेअरीचे माजी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष तथा दूध उत्पादक दुर्गेश शिरोडकर यांनी गोवा डेअरी नफ्यात चालत असल्याने ही नोटीस पाठवल्यामुळेच खळबळ उडाल्याचे सांगितले.

पशुखाद्य प्रकल्प तोट्यात...

गोवा डेअरी ही दूध उत्पादकांची शिखर संस्था असल्याने ती नफ्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत, सध्या दूध प्रकल्प नफ्यात आहे मात्र पशुखाद्य प्रकल्प तोट्यात आहे. हा तोटा दूर करण्यासाठी आवश्यक निर्णय घेऊन हा प्रकल्प पुन्हा सुरू करायला हवा, असे दुर्गेश शिरोडकर म्हणाले. दरम्यान, गोवा डेअरीचे दूध उत्पादक तसेच कर्मचार्‍यांच्या गुणवंत मुलांचा गौरव करण्यासंबंधीच्या विषयाला यावेळी मान्यता देण्यात आली.

गोवा डेअरीला 70 लाख रुपये नफा

गोवा डेअरीकडून सध्या पन्नास हजार लिटर दुधाची निर्मिती केली जात असून, मागील आर्थिक वर्षात 70 लाख रुपये नफा झाला आहे. याशिवाय पशुखाद्य प्रकल्पाचे एकूण साडेबारा कोटीचे नुकसान साडेअकरा कोटींवर आले आहे. पशुखाद्य प्रकल्पाला कच्चा माल देणार्‍यांची बिले थकल्याने ही एवढी रक्कम झाल्याचे पराग नगर्सेकर यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT