CM Pramod Sawant  File Photo
गोवा

CM Pramod Sawant | नशामुक्तीवर भर देणार, मुख्यमंत्र्यांची स्वातंत्र्यदिनी घोषणा

पुढारी वृत्तसेवा

अनिल पाटील

पणजी : गोव्यात वाढणारा अमली पदार्थांचा वापर, व्यवहार रोखण्यासाठी आणि नशामुक्तीसाठी राज्य सरकारच्या अमली पदार्थ विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात दिली.

स्वातंत्र्यदिनानिमित्त पणजीतील जुन्या सचिवालयासमोर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री बाबूश मोन्सेरात, विविध खात्याचे सचिव, विभाग प्रमुख, सेना दलातील अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यात वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या खाजन जमिनींच्या संवर्धनासाठी 'खाजन विकास आणि संवर्धन मंडळ' स्थापन करून खाजन जमीन वाचवली जाईल, याबरोबरच राज्य कर्मचारी भरती आयोगामार्फत येत्या वर्षभरात सरकारी खात्यांतील २,५०० रिक्त पदे भरण्यात येतील.

गोव्याचा आज सर्वच बाबतीत झपाट्याने विकास होत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंय भारताला विकसित करण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यामुळे विकसित भारत आणि विकसित गोव्यासाठी गोमंतकीय जनतेने पूर्ण योगदान दिले पाहिजे असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

राज्यातील शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल केले जात आहेत. त्याचा फायदा राज्यात शिकणार्‍या तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनवण्याच्या निर्धाराने सरकार काम करत आहे. त्यासाठी पुढील काळात राज्यातील सर्व सरकारी आयटीआय अपग्रेड करण्यात येतील. तेथे आधुनिक तंत्रज्ञानाची उभारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  कृषी क्षेत्रातील बदल आणि नवनव्या योजनांमुळे राज्यातील कृषी उत्पादनात वाढ होत आहे. येणार्‍या काळात फोंडा आणि वाळपईत कृषी कार्यालये स्थापन करण्यात येतील, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यातील प्रशासकीय व्यवस्था बळकट केली जात आहे. त्याअनुषंगाने नऊ तालुक्यांत नव्या प्रशासकीय इमारती उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात लवकरच पशुपालन महाविद्यालयाची स्थापना करण्यात येणार असल्याचे आणि येत्या १९ डिसेंबर रोजी राज्याला १०० टक्के साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले. 

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक नितीन रायकर यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले. याबरोबरच पोलीस दलातील अरुण बाकरे आणि महेश सावळ यांना गृह मंत्रालयाची सेवा पदके देण्यात आली. स्वातंत्र्यसैनिक सुरेश पारोडकर, तर परशुराम शहापूरकर, पांडुरंग कुंडईकर, पुरुषोत्तम सावंत, वासुदेव कुबल या चार दिवंगत स्वातंत्र सैनिकांना राज्य पुरस्काराने प्रदान करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT