प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या चार जणांनी हातात पोस्टर घेऊन घोषणाबाजी सुरू केली  Pudhari
गोवा

Goa Assembly Session | गोवा विधानसभेत मिराबाग बंधाऱ्यावरून गदारोळ; हातात पोस्टर घेऊन गॅलरीतून घोषणाबाजी

आमदार विजय सरदेसाई यांनी मिराबाग बंधाऱ्याबाबत विशेष स्थगन प्रस्ताव मांडत चर्चेची केली मागणी

पुढारी वृत्तसेवा

Mirabag Dam Protest Goa Assembly

पणजी : गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारी (६ मार्च) सुरू होताच सभागृहात गदारोळाची परिस्थिती निर्माण झाली. प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वी आमदार विजय सरदेसाई यांनी मिराबाग बंधाऱ्याबाबत विशेष स्थगन प्रस्ताव मांडत त्यावर चर्चेची मागणी केली. मात्र सभापतींनी या विषयावर पुढे चर्चा होणार असल्याचे सांगत स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला.

याचवेळी प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या चार जणांनी हातात पोस्टर घेऊन घोषणाबाजी सुरू केली. गॅलरीतून अशा प्रकारे घोषणाबाजी झाल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली. सुरक्षारक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्या चारही जणांना ताब्यात घेतले.

या प्रकारामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत संतप्त झाले. सभागृहाच्या विशेषाधिकाराचा भंग झाल्याचे सांगत त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. अशा प्रकारच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देणे धोकादायक असल्याचे सांगत, उद्या अशाच लोकांकडून सभागृहात गंभीर प्रकार घडू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. विरोधी आमदारांनी संयम बाळगावा व अशा लोकांना सभागृहात आणू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत गॅलरीतून घोषणाबाजी झाल्याचा असा प्रकार कधीही पाहिला नसल्याचे सांगितले. विरोधी आमदारांच्या प्रोत्साहनामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप करत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनीही या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मिराबाग बंधारा हा गोव्याच्या हितासाठी आवश्यक प्रकल्प असून विरोधक लोकांची दिशाभूल करत आंदोलनास प्रवृत्त करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनीही प्रतिक्रिया देताना, आम्हीही मोठ्या संख्येने लोकांना आणू शकतो, असा इशारा दिला. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी विजय सरदेसाई यांनी सभापतींना उद्देशून केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतला.

सभापती डॉ. गणेश गावकर यांनीही या घटनेवर कठोर भूमिका घेत, सभागृहात अशा प्रकारे गोंधळ घालणाऱ्यांवर तसेच त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.

‘असा प्रकार सहन केला जाणार नाही’
सभागृहात गॅलरीतून घोषणाबाजी करण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगत सभापती डॉ. गणेश गावकर यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला. भविष्यात अशा प्रकाराला अजिबात सहन केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘ही अराजकता’ – सुभाष शिरोडकर
जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, मिराबाग बंधारा हा गोवेकरांच्या हिताचा प्रकल्प आहे. गेल्या ३५ वर्षांत सभागृहात असा प्रकार क्वचितच पाहायला मिळाला आहे. विरोधक लोकांची दिशाभूल करत आंदोलनास प्रवृत्त करत असून हा प्रकार अराजकतेकडे नेणारा असल्याची टीकाही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT