

पणजीः पुढारी वृत्तसेवा
येत्या अधिवेशनात भाजप सरकारला घेरण्याची तयारी विरोधी पक्षातील आमदारांनी केली आहे. विविध पातळीवरील सरकारचे अपयश आणि अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पर्यटन क्षेत्राची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची प्रतिमा मलिन केल्याबद्दल सरकारला जबाबदार धरण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात झालेल्या बैठकीला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई, आमदार अॅड. कार्लोस फरेरा, आमदार एल्टोन डीकॉस्टा, आमदार वीरेश बोरकर आणि आमदार वेन्झी व्हिएगस उपस्थित होते. युरी आलेमाव म्हणाले की, बैठकीत सरकारला धारेवर धरण्यासाठी विविध रणनीती सुचवण्यात आल्या.
गोवेकरांना न्याय मिळेल यासाठी रणनीती आखली आहे. सत्ताधाऱ्यांकडे ३३ आमदार असूनही हे सरकार विधानसभेच्या अधिवेशनात अपयशी ठरेल. लोकांचा आवाज बनून, आम्ही जमीन रूपांतरण, बेरोजगारी, नोकऱ्यांसाठी लाचखोरी, नाईट क्लबमधील लोकांचे सामूहिक हत्याकांड आणि ढासळती अर्थव्यवस्था यांसारख्या मुद्द्यांसाठी जबाबदार धरण्याचा निर्धार केला आहे. असेही ते म्हणाले.
आलेमाव यांनी सांगितले की, खाणकाम थांबल्यानंतर पर्यटन हा अर्थव्यवस्थेचा कणा बनला होता. पण, या सरकारने हा कणाच मोडला आहे. त्यांच्याकडे महसुलासाठी कोणतीही योजना नाही, त्यामुळे पगार देण्यासाठीही कर्ज घ्यावे लागत आहे. पर्यावरणाचा विनाश हाही मुद्दा असेल, असेही ते म्हणाले.
हितसंबंधी भांडवलदारांना गोवा विकला
जमीन रूपांतरण आणि बेकायदेशीरपणे मेगा प्रकल्पांना परवानगी देऊन, भाजप सरकारने गोवा आपल्या हितसंबंधी भांडवलदारांना विकला आहे. म्हणूनच लोक आपल्या गावांना वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत आणि न्याय मागत आहेत. मला खात्री आहे की, लोक या सरकारच्या दादागिरीला घाबरणार नाहीत, तर गावे आणि आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी लढतील, असे आलेमाव म्हणाले.