

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
सत्ताधारी भाजपच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या वेळी एकत्र आलेल्या घटक पक्षांमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र असताना फातोर्डा मतदारसंघातील कार्निव्हलच्या मंचावर गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युती जाहीर करून भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीतनंतर सत्तेत येणारे सरकार हे काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डचेच असेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. हे दोन्ही नेते कार्निव्हलच्या मंचावर एकत्र आले होते. सुरुवातीला आमदार सरदेसाई यांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसने सुशेगादपणाची वृत्ती सोडून तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, असे आवाहन यांनी केले.
काँग्रेस हा आमच्या युतीतील महत्त्वाचा घटक असून, गोवा फॉरवर्ड पक्षाने काँग्रेससमोर काही महत्त्वाचे प्रस्ताव ठेवले आहेत. गोव्याच्या हितासाठी काँग्रेसने वेळ न दवडता सकारात्मक पावले उचलावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. सरदेसाई म्हणाले, राज्यातील अनेक तरुण रोजगाराच्या शोधात परदेशात जात आहेत. त्यांना दुहेरी नागरिकत्वाचा हक्क मिळावा, यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
गोव्याच्या राजकारणात यावर्षी 'मेक गोवा' किंवा 'ब्रेक गोवा' अशी निर्णायक स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे काँग्रेसने अधिक वेळ न घालवता आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, गोव्यात कार्निव्हलच्या काळात केवळ पाच दिवसच 'मोमो 'ची राजवट असते.
मात्र, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डचे सरकार सत्तेत आल्यानंतर वर्षभर गोमंतकीय आनंद आणि उत्साह कायम राहील. या कार्निव्हल सोहळ्याला लंडनचे खासदार किथ वाझ, काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, युवा काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक, दुर्गादास नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.