गोवा

गोवा : भाजपने केली सामान्यांची थट्टा

अनुराधा कोरवी

पणजी : पुढारी वृत्तसेवा : भाजप सरकारने फेब्रुवारी 17 रोजी प्रसिद्ध केलेल्या गॅजेटनुसार निवासी आणि व्यावसायिक जागेच्या घरपट्टीत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे भाजपने सामन्यांची क्रूर थट्टा केल्याची टीका आम आदमी पक्षाने शुक्रवारी केली.

आपचे फोंडा उमेदवार सुरेल तिळवे म्हणाले की, कोव्हिडमुळे लोकांवर विपरित परिणाम होत असताना भाजपचे हे नवे धोरण अमानवीय आहे. हा नवा दर निवडणुकीनंतर लागू केला असून भाजप सरकारने पुन्हा एकदा लूट सुरू केली आहे.

संपूर्ण राज्य कोव्हिड-19 च्या विळख्यात अडकला असून लोक आर्थिकदृष्ट्या त्रस्त आहेत. या परिस्थितीतही लोकांना किराणा, एलपीजी, पेट्रोलच्या वाढलेल्या किमतीचा सामना करत आहे. आता सरकारच्या या घरपट्टी दरवाढीमुळे निम्न उत्पन्न गटातील लोकांवर आर्थिकदृष्ट्या आणखी भर पडणार आहे, असे तिळवे यांनी सांगितले.

सध्या सरकारने पंचायत क्षेत्रातील घरपट्टीत वाढ लागू केली आहे. याआधी निवासी जागेसाठी प्रति चौरस मीटर 8 रुपये असा कर होता. तो आता 40 रुपये मीटर इतका करण्यात आला आहे. यापूर्वी, व्यावसायिक जागेसाठी 10 रुपये प्रति चौरस मीटर असा शुल्क आकारला जात होता. परंतु ते आता 200 रुपये प्रति चौरस मीटर करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

यापूर्वी वर्षाला 800 रुपये भरणार्‍या सर्वसामान्य व्यक्तीला सध्या 100 चौरस मीटरच्या घरासाठी 4 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. ही सर्वसामान्यांची थट्टा आहे. सरकार केवळ निवडणूक जवळ येताच सामान्यांचे मुद्दे मांडतो. नंतर या प्रकारचे धोरण आणून सामान्यांचे हाल करतो, असे ते पुढे म्हणाले.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT