रोम : वृत्तसंस्था : एकेकाळी जगातील सर्वात सुंदर महिला अशी ओळख असलेल्या इटालियन अभिनेत्री गिना लोलोब्रिगिडा यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी इटलीतील रोम येथे निधन झाले. त्या उत्कृष्ट शिल्पकारही होत्या. छायाचित्रकार, गिना लोलोब्रिगिडा यांचे नातू व इटालीचे कृषिमंत्री फ्रान्सिस्को लोलोब्रिगिडा यांनी माहिती दिली की, गिनी यांच्यावर रोम येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा मिको आणि नातवंडे असा परिवार आहे. (Gina Lollobrigida)
१९५० आणि १९६० ही दोन दशके त्यांनी गाजवली. इटालियन आणि हॉलीवूड सिनेमांतील सगळ्याच यशस्वी नायकांसोबत त्यांनी नायिका म्हणून काम केले. १९६१ च्या गाजलेल्या 'कम सप्टेंबर' या चित्रपटाने त्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या होत्या. त्यांनी फोटो जर्नालिस्ट म्हणूनही काम केले. क्युबाचे राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांची भेट घेण्याची व छायाचित्रे काढण्याची संधी त्यांना शीतयुद्धाच्या काळात मिळाली.
१९७८ साली त्या हिंदी चित्रपटात काम करणार होत्या. धर्मेंद्र यांच्यासोबत 'शालीमार' या चित्रपटासाठी त्यांना करारबद्धही केले होते. झीनत अमान आणि गिना अशा दोन नायिका असलेल्या या चित्रपटाच्या मुहूर्तासाठी गिना मुंबईतही आल्या होत्या; पण काही कारणाने नंतर त्यांनी हा चित्रपट सोडला.
हेही वाचा