पुणे : विद्या प्राधिकरणाला प्रश्नपेढीचा विसर! संकेतस्थळावर दहावी-बारावीच्या गेल्या वर्षीच्याच प्रश्नपत्रिका | पुढारी

पुणे : विद्या प्राधिकरणाला प्रश्नपेढीचा विसर! संकेतस्थळावर दहावी-बारावीच्या गेल्या वर्षीच्याच प्रश्नपत्रिका

गणेश खळदकर : 

पुणे : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करता येण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (विद्या प्राधिकरण) विषयनिहाय नमुना प्रश्नसंच ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतात. परंतु, यंदा मात्र अशा प्रकारचे प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. त्यामुळे विद्या प्राधिकरणाला दहावी-बारावीच्या प्रश्नपेढींचा विसर पडला का? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केला आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रत्येक विषयाची चांगल्या पद्धतीने तयारी करण्यासाठी, स्वयंअध्ययन करण्यासाठी विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून नमुना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येतात. त्यानुसार गेल्या वर्षी देखील बारावीचे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र, इंग्रजी, गणित आणि संख्याशास्त्र (वाणिज्य) इतिहास (मराठी, इंग्रजी), भूगोल (मराठी) या विषयांचे प्रश्नसंच, तर दहावीच्या गणित भाग 1 आणि 2, इतिहास आणि राज्यशास्त्र (मराठी), भूगोल (मराठी, इंग्रजी), कुमारभारती आदी विषयांचे प्रश्नसंच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले होते. मात्र, यंदा अशा प्रकारचे प्रश्नसंच उपलब्ध केल्याचे दिसून येत नाही.

गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे दहावी-बारावीचा 25 टक्के अभ्यासक्रम कपात केला होता. त्यानुषंगानेच प्रश्नपत्रिका तयार केल्या होत्या. यंदा दहावी-बारावीची परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित आहे. त्यानुसार प्रश्नपेढी तयार करून विद्या प्राधिकरणाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र तसे झालेले नाही. यासंदर्भात विद्या प्राधिकरणातील अधिकार्‍यांकडे चौकशी केली असता अद्याप तरी तशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार केलेल्या नाहीत. तसेच, गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका या 75 टक्के अभ्यासक्रमावर जरी असल्या, तरी गुणदान 100 टक्केच होते. त्यामुळे गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकाच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार असल्याचे स्पष्टीकरण विद्या प्राधिकरणातील अधिकार्‍यांनी दिले आहे.

विद्यार्थ्यांना दहावी-बारावी परीक्षांचा सराव गरजेचा आहे. त्यासाठी पूर्ण अभ्यासक्रमावरील प्रश्नपत्रिका सरावासाठी अपेक्षित आहेत. परीक्षेचा कालावधी यंदा कमी केल्यामुळे तसेच लेखनकौशल्य कमी झाल्यामुळे प्रश्नपत्रिकांचा सराव उपयुक्त ठरतो. त्यामुळे सुधारित पद्धतीने प्रश्नपत्रिका उपलब्ध करणे गरजेचे आहे.
                                          – महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ

Back to top button