निवडणूक निकाल स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर इम्‍यॅनुएल मॅक्रॉन यांच्‍या समर्थकांनी एकच जल्‍लाेष केला.  
Latest

French Presidential Election : पुतीन समर्थक ले पेन यांना फ्रान्‍सच्‍या जनतेने नाकारले, पुन्‍हा एकदा मॅक्राॅन यांच्‍या नेतृत्‍वावर विश्‍वास

नंदू लटके

पॅरीस : पुढारी ऑनलाईन
फ्रान्‍स राष्‍ट्रपतीपदासाठी झालेल्‍या निवडणुकीत विद्यमान राष्‍ट्रपती इम्‍यॅनुएल मॅक्रॉन यांनी बाजी मारली आहे. पुतीन यांच्‍या समर्थक अशी ओळख असणार्‍या मरीन ले पेन यांना जनतेने नाकारले.  मागील २० वर्षांमध्‍ये सलग दुसर्‍यांदा राष्‍ट्रपतीपदी विराजमान होण्‍याचा बहुमान मिळवणारे मॅक्रॉन हे पहिले राष्‍ट्रपती ठरले आहेत.

French Presidential Election : हिजाब, महागाई निवडणुकीतील प्रमुख मुद्‍दे

फ्रान्‍स राष्‍ट्रपती निवडणुकीतही वाढती महागाई, जलवायू परिवर्तन, हिजाब, मुस्‍लिम प्रवाशांना देशात आश्रय देणे आदी मुद्‍दे प्रमुख होते. निवडणूक रिंगणात एकुण १२ उमेदवार होते. मात्र मुख्‍य लढत ही मॅक्रॉन आणि पेन यांच्‍यामध्‍येच होती. पहिल्‍या टप्‍प्‍यातील मतदानानंतर डाव्‍या पक्षाचे उमेदवार ज्‍यां लुस मेलेंको यांनी मॅक्रॉन यांना समर्थन देण्‍याची घोषणा केली होती. त्‍यांनी आपल्‍या समर्थकांना पेन यांना मतदान करु नये, असे आवाहन केले होते.

French Presidential Election : मी एक निष्‍पक्ष समाजासाठी काम करेन

नाटो आणि युरोपीय संघाचे इम्‍यॅनुएल मॅक्रॉन यांना समर्थन होते. यंदाच्‍या राष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणुकीत हिंसाचाराच्‍या घटना घडल्‍या. अखेर मॅक्रॉन यांनी बाजी मारल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या समर्थकांनी एकच जल्‍लोष केला. पॅरीसमधील आयफेल टॉवर मैदानावर त्‍यांनी समर्थकांना संबोधित केले. ते म्‍हणाले, पुन्‍हा एकदा माझ्‍यावर विश्‍वास दाखवला याबद्‍दल मी सर्वांचा आभारी आहे. मी सदैव तुमचा ऋणी राहिन. मी एक निष्‍पक्ष समाजासाठी काम करेन. देशात महिला आणि पुरुष यांच्‍या समानता असावी. आगामी काळात आपल्‍यासमाेर निश्‍चित अनेक आव्‍हाने आहेत. आपण सर्वजण मिळून नव्‍या पिढीच्‍या उज्‍ज्‍वल भवितव्‍यासाठी प्रयत्‍नशील राहूया.

राष्‍ट्रपतीचे आर्थिक सल्‍लागार ते राष्‍ट्रपती

मॅक्रॉन यांचा जन्‍म उच्‍च मध्‍यमवर्गीय कुटुंबात झाला. काही वर्ष त्‍यांनी प्रशासनात नोकरी केली. यानंतर एक बँकर
म्‍हणूनही त्‍यांनी काम केले. याच काळात त्‍यांना समाजवादी विचारसरणीचे राष्‍ट्रपती फ्रांसिस ओलांद यांच्‍या आर्थिक
सल्‍लागार म्‍हणून काम करण्‍याची संधी मिळाली. यानंतर २०१४ ते २०१६ मध्‍ये त्‍यांनी ओलांद सरकारमध्‍ये अर्थमंत्रीपद भूषवले. यानंतर खर्‍या अर्थाने ते राजकारणात सक्रीय झाले.

कठीण परिस्‍थिती हाताळणारा नेता

मागील निवडणुकीत इम्‍यॅनुएल मॅक्रॉन हे राजकारणात नवखे होते. मात्र आता सलग दुसर्‍यांदा निवडणूक जिंकत त्‍यांनी स्‍वत:ला सिद्‍ध केले आहे. आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर फ्रान्‍सचा नेता अशी स्‍वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्‍यात ते यशस्‍वी ठरले आहेत. युरोपीयन संघातील महत्त्‍वपूर्ण निर्णयात त्‍यांचे योगदान लक्षणीय आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धविरामासाठी ते प्रामाणिक प्रयत्‍न करत आहेत. त्‍यामुळेच कोरोना महामारी असो की रशिया-युक्रेन युद्ध या कठीण परिस्‍थिीतमध्‍ये त्‍यांनी घेतलेल्‍या निर्णयांचे फ्रान्‍समधील नागरिकांनी स्‍वागत केले असून त्‍यांना पुन्‍हा एकदा देशाचे नेतृत्‍व करण्‍याची संधी दिली आहे.

भारतासह युरोपमधील नेतृत्‍वाने केले अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनेचे पंतप्रधान बोरीस जॉन्‍सन, इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी, स्‍पेनचे पंतप्रधान पॅड्रो सांचेज आणि युक्रेनचे राष्‍ट्रपती वोदोदिमीर झेंलेन्‍स्‍की यांनी अभिनंदन केले आहे. यांनी मॅक्रॉन यांचे अभिनंदन केले आहे. मागील २० वर्षांमध्‍ये सलग दुसर्‍यांदा राष्‍ट्रपतीपदी विराजमान होण्‍याचा बहुमान मिळवणारे ते पहिले राष्‍ट्रपती ठरले आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT