क्रेडिट कार्डचा वापर करताय? क्रेडिट लिमिटबाबत ही काळजी घ्या | पुढारी

क्रेडिट कार्डचा वापर करताय? क्रेडिट लिमिटबाबत ही काळजी घ्या

सध्या क्रेडिट कार्ड वापराचे प्रस्थ वाढले आहे. शॉपिंगसाठी पेमेंट करण्यासाठी हे एक लोकप्रिय पेमेंट माध्यम आहे. काही क्रेडिट कार्ड कंपन्या तीन महिन्यांपर्यंत व्याजमुक्‍त क्रेडिट ग्राहकांना देतात. या कारणामुळेच बहुतांश मंडळी क्रेडिट कार्डच्या मदतीने बिनधास्त खरेदी करतात. परंतु आपण क्रेडिट कार्डच्या मर्यादेचा पूर्ण वापर केला, तर त्यामुळे काय नुकसान होते, हे ठाऊक आहे का?

क्रेडिट लिमिट म्हणजे क्रेडिट कार्डधारकासाठी निश्‍चित केलेली खर्चाची कमाल मर्यादा. क्रेडिट कार्डवर मिळणारे लाभ आणि वैशिष्ट्यांच्या आधारावर क्रेडिट लिमिट अवलंबून असते. क्रेडिट लिमिट निश्‍चित करण्यासाठी कोणताही सर्वमान्य मार्ग नाही. खर्चाची मर्यादा ठरवण्याचा अधिकार हा बँकांनाच असतो. यासाठी बँकांकडून विविध निकषांचे आकलन केले जाते आणि मर्यादा ठरवली जाते.

क्रेडिट स्कोअर खराब होतो

तज्ज्ञांच्या मते, या क्रेडिट लिमिटचा पूर्ण वापर कधीच करू नये. त्याचा पूर्ण वापर केल्याने क्रेडिट यूटिलायझेशन रेशो वाढतोे. यात क्रेडिट कार्ड होल्डरचा क्रेडिट स्कोअर हा खराब होतो. परिणामी, आपल्याला भविष्यात कर्ज घेताना अडचणी येऊ शकतात. क्रेडिट स्कोअर एजन्सी या क्रेडिट यूटिलायझेशन रेशो निश्‍चित करतात. यानुसार कार्डधारकाचे कर्ज घेणे किंवा उधार घेण्याचे प्रमाण कळते.

क्रेडिट लिमिट कमी होऊ शकते

एखादा क्रेडिट कार्डधारक सतत क्रेडिट बॅलन्स शून्य करत असेल, तर अशा वेळी ग्राहकाची क्रेडिट लिमिट बँकेकडून कमी केली जाते. कारण भविष्यात संबंधित ग्राहक हा डिफॉल्ट होऊ शकतो, अशी भीती बँकेला वाटत असते. क्रेडिट लिमिट कमी होत असेल, तर क्रेडिट स्कोअर हा आपोआपच कमी होतो. म्हणून क्रेडिट बॅलन्स शून्यावर आणू नये. एखादा ग्राहक दीर्घकाळापर्यंत अशी कृती करत असेल, तर बँकांकडून त्याचे कार्ड डिअ‍ॅक्टिव्हेट केले जाऊ शकते.

प्रतिमेवर नकारात्मक परिणाम

एखादा कार्डधारक हा आपले क्रेडिट कार्ड बॅलन्स शून्य करत असेल, तर कार्डधारकाच्या आर्थिक प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होतो. यानुसार बँक आणि क्रेडिट स्कोअर एजन्सी ही संबंधित ग्राहकाबाबत एक मत तयार करते आणि ते म्हणजे कार्डधारक हा खूप खर्चिक असून, त्याला खर्चाचे नियोजन करता येत नाही. याप्रमाणे कार्ड लिमिटचा आढावा घेतला जातो.

क्रेडिट लिमिटप्रमाणेच क्रेडिट कार्डच्या कॅशलादेखील मर्यादा असते. याचा अर्थ, क्रेडिट कार्डच्या मदतीने किती रोख रक्‍कम काढू शकता. यावरचा बॅलन्सदेखील कधीही शून्य करू नये. आपल्याकडून सातत्याने ही कृती होत असेल, तर क्रेडिट स्कोअरवर त्याचा परिणाम होईल. यानुसार भविष्यात कर्ज घेण्यास अडचणी येतील.

योगेश देसाई

Back to top button