कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशियाने 24 फेब्रुवारीला युक्रेनवर (Russia Ukraine War) हल्ल्यास सुरुवात केली आणि आता युद्धाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. कुणीही माघार घ्यायला तयार नाही. त्यातच आता रशियाने बेलगोरोड जवळ सीमेवर इस्कंदर क्षेपणास्त्र तैनात केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. ही यंत्रणा कमी लांबीच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी युक्त अशी आहे. याच मिसाईल सिस्टिमद्वारे रशिया युक्रेनवर (Russia Ukraine War) अण्वस्त्र हल्ला करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या यंत्रणेद्वारे 480 ते 700 किलोची अण्वस्त्रे किंवा इतर अस्त्रे वॉरहेड नेली जाऊ शकतात. दरम्यान, रशियन सैन्याने डोनेस्टक येथे हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. क्षेपणास्त्र आणि उखळी तोफांचा मारा येथे केला जात आहे. ओडेशा शहरात रशियाने डागलेल्या क्षेपणास्त्राने 8 जणांचा मृत्यू झाला. यात तीन महिन्यांच्या एका बालिकेचाही समावेश आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी मॉस्को दौर्यानंतर कीव्हला येण्यावरून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी प्रश्न उपस्थित केले. मॉस्कोच्या रस्त्यांवर मृतदेहांचा खच नाही. त्यामुळे त्यांनी आधी युक्रेनला यायला हवे होते, असे झेलेन्स्की म्हणाले.
युक्रेनचा स्फोटकांचा कारखाना उद्ध्वस्त (Russia Ukraine War)
मध्य युक्रेनमधील पाव्हलोरॅड जवळील स्फोटकांचा कारखाना क्षेपणास्त्र डागून नष्ट करण्यात आला आहे. तसेच बार्निकोव्हे, नोव्हा, दमित्रिव्हका, इव्हानिव्हका, हुसारिव्हका, वेलायका कोमिशुवाखा येथील शस्त्रडेपोही उद्ध्वस्त केले गेले आहेत, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता मेजर जनरल इगॉर कोनाशेनकोव्ह यांनी दिली.
युक्रेनमध्ये 'इस्टर'ची तयारी
युक्रेनमध्ये सध्या युद्धपरिस्थिती असली तर येथील नागरिकांच्या मनात परिस्थिती पूर्ववत होण्याची आशा आहे. त्यामुळेच युक्रेनमध्ये पारंपरिक 'इस्टर' हा सण साजरा करण्याची तयारी केली जात आहे. आगामी पाच दिवस सर्व प्रथा-परंपरांसह हा सण साजरा केला जाणार आहे.
रशिया युक्रेन युद्ध 60 वा दिवस
* युक्रेनने खेरसन येथे रशियाची एक चौकी उद्ध्वस्त केली. यात रशियाचे दोन वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती आहे.
* खारकोव्ह येथे युक्रेनचे एसयू-25 लढाऊ विमान रशियाने पाडले. तसेच तीन एमआय-8 हेलिकॉप्टरही उद्ध्वस्त केली.
* मारियुपोल येथे क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अनेक घरांना आग.
* तुर्कीने रशियासाठी त्यांची एअरस्पेस रशियासाठी बंद केली आहे. त्यामुळे आता रशियन विमानांना तुर्कीवरून सिरीयाला जाता येणार नाही.
* मारियुपोलमधून एक लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याची तयारी युक्रेनने केली आहे.