सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :
क्रिकेट जगतात सोलापूरचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेणारे ज्येष्ठ क्रिकेटपटू सलीम खान (Cricketer Salim Khan ) यांचे आज (दि. २) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६२ वर्षांचे हाेते.
सलीम खान यांना आज पहाटे चार वाजता हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. सकाळी दहाच्या सुमारास सलीम खान यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
सलीम खान यांनी प्रतिकूल परिस्थितीमधून क्रिकेट जगतात आपलं स्थान निर्माण केले होते. उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. पार्क मैदानावर त्यांनी मारलेला उत्तुंग षटकार हा नेहरू वसतिगृहात गेला हाेता, अशी आठवण आजही सांगितली जाते.
सलीम खान यांनी स्पोर्ट्स अकॅडमी स्थापन केली. येथे वर्षभर शिबिरांचे आयाेजन करण्यात येत असे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चांगले खेळाडू तयार झाले. महिला रणजीपटू मानसी जाधव हिला त्यांचे मार्गदर्शन लाभले. पार्क स्टेडियम उभारणीत त्यांचे मोठे योगदान हाेते. त्यांच्या निधनाने मित्रमंडळींसह संपूर्ण सोलापूरवर तसेच क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
हेही वाचलतं का?