Latest

मोठी बातमी! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन

दीपक दि. भांदिगरे

नारा (जपान); पुढारी ऑनलाईन : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात हल्ला झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दरम्यान, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे वृत्त जपानमधील NHK WORLD News ने दिले आहे. शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात हल्ला करण्यात आला होता. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. शिंजो आबे हे पश्चिम जपानमधील नारा शहरातील एका प्रचारसभेत संबोधित करत होते. भाषण करत असताना ते अचानक खाली कोसळले. त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांच्या छातीत गोळी लागली होती. यामुळे ते गंभीर जखमी होते. बेशुद्ध अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या हल्लाप्रकरणी पोलिसांनी नारा शहरातील ४१ वर्षीय यामागामी तेत्सुयाला याला हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याच्याकडून बंदूक जप्त करण्यात आली आहे.

नारा शहरात लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी भाषण करत असताना शिंजो आबे हे अचानक खाली कोसळले. घटनास्थळी असलेल्या पत्रकारांनी त्यांना गोळी लागल्याचे म्हटले होते. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरुन एका संशयिताला अटक केली आहे. शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याचा जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

शिंजो आबे यांच्यावर ज्या ठिकाणी गोळ्या झाडण्यात आल्या त्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेने सांगितले की, बंदुकीच्या दुसऱ्या गोळीनंतर आबे खाली कोसळले. आबे भाषण करत असताना त्यांच्या पाठीमागून एक माणूस आला. पहिली गोळी झाडल्यानंतर आबे खाली कोसळले नाहीत. पण दुसऱ्या गोळी छातीवर लागताच आबे खाली कोसळल्याचे सदर महिलेने म्हटले आहे. संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न न करता तो जागेवरच थांबला. त्याने बंदूक खाली ठेवली. त्यानंतर त्यांनी लोकांनी पकडले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पण हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याने व्यथित होत, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले होते. पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "माझे प्रिय मित्र शिंजो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. आमच्या प्रार्थना त्यांच्या, त्यांचे कुटुंब आणि जपानच्या लोकांसोबत आहेत", असेही ते म्हणाले.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. भारत आणि जपान यांच्यातील संबंध वृद्धीगत करण्यात शिंजो आबे यांचा मोलाचा वाटा आहे. २०१७ मध्ये ते भारतात आले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद विमानतळावर त्यांचे स्वागत केले होते. तसेच २०१८ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपान दौऱ्यावर गेले होते. तेव्हा शिंजो आबे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुसाखतीत पंतप्रधान मोदी हे माझे जवळचे आणि अत्यंत विश्वासू मित्र असल्याचे सांगितले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT