नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : हवाला प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते सत्येंद्र जैन यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी जैन यांचा जामीनअर्ज फेटाळून लावला होता. त्याला आव्हान देत जैन यांनी ही याचिका दाखल केली आहे.
दिल्लीचे माजी मंत्री असलेले जैन हे गतवर्षीच्या जून महिन्यापासून तिहार तुरुंगात बंद आहेत. मागील नोव्हेंबर महिन्यात तुरुंगातच इतर कैद्यांकडून बॉडी मसाज करुन घेतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने ऑगस्ट २०१७ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याची दखल घेत ईडीने जैन यांच्याविरोधात हवालाची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात जैन यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पूनम जैन, अजित जैन, सुनीलकुमार जैन, वैभव जैन आणि अंकूश जैन हेही आरोपी आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये सीबीआयने सर्व आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. मंत्री म्हणून कार्यरत असताना पदाचा गैरवापर करीत कोट्यवधी रुपयांची माया जमविल्याचा गंभीर आरोप जैन यांच्यावर आहे.
हेही वाचा :